मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी तत्त्वांना तिलांजली दिली ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

सिंधुदुर्ग, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्रात सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले असून हे ३ चाकांचे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे कोणतेही वचन मी दिलेले नव्हते, हेच सांगायला मी इथे आलो आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी जनदेशाचा अनादर करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर केला आहे.

प्रथमच सिंधुदुर्गात उपस्थित राहिलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भाजप नेत्यांनी स्वागत केले. त्यानंतर अमित शहा यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या कुडाळ तालुक्यातील पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेजचा (वैद्यकीय महाविद्यालयाचा) शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी भाजपचे नेते उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले आणि ते आम्ही पाळले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे वचन दिले असते, तर नक्कीच पाळले असते. ठाकरे म्हणतात, मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिले होते; पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचे ते सर्वांसमोर उघडउघड करतो.

सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे हा फार धाडसी निर्णय होता. ६५० खाटांचे रुग्णालय उभारणे, हे खूप आव्हानात्मक आहे. आज देशाला डॉक्टरांची खूप आवश्यकता आहे. देशात डॉक्टरांची कमतरता आहे. ही कमतरता या महाविद्यालयाकडून दूर करण्याचा प्रयत्न होईल. महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात रुग्ण वाढले आणि मृत्यूही अधिक झाले. याला सर्वस्वी राज्य सरकार उत्तरदायी आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे, तसेच अन्य नेत्यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाला भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे काही वैशिष्ट्यपूर्ण उद्गार !

१. सर्वांत आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करून धन्य झालो. या भूमीकडून प्रचंड चेतना मिळते; कारण याच भूमीने संपूर्ण देशाला स्वदेशासाठी, स्वधर्मासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जीव देण्याचा संस्कार दिला आहे.

२. जेव्हा मोगलांचे राज्य होते, औरंगजेबाचे राज्य होते, तेव्हा चोहोबाजूंनी अंधार होता. कुठेही प्रकाशाची चिन्हे दिसत नव्हती. त्या वेळी एका युवा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून चालू झालेली ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत चालू आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे साहस केले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक पराक्रम केले. आपल्या जिवाची बाजी लावून ते स्वधर्मासाठी लढले. भारतात सर्वांत पहिली नौसेना बनवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमीत केले. या नौसेनेच्या माध्यमातून त्यांनी परकीय आक्रमणे परतवून लावली.