मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वीज देयकाच्या प्रश्नावर गौप्यस्फोट
मुंबई – वीज देयक माफ करण्याच्या सूत्राविषयी मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेलो. राज्यपालांनी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करायला सांगितली. त्यानंतर मी पवार यांच्याशी बोललो. या वेळी पवार म्हणाले की, वीज आस्थापनांच्या नावाने मला पत्र लिहून मला पाठवा. त्यामध्ये उद्योगपती अदानी, वीज वितरण आस्थापने असो वा टाटा आस्थापन, मी त्यांच्याशी बोलतो. मग ५-६ दिवसांनी मला असे समजले की, अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेले. चर्चा काय झाली हे मला माहीत नाही; पण त्यानंतर सरकारने वीज देयक माफ केले जाणार नाही, असे सांगितले. वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.
दळणवळण बंदीच्या काळात नागरिकांना वीज आस्थापनांकडून अधिकची वीज देयके देण्यात आली होती. ही वाढीव देयके माफ करण्यासाठी मनसेने राज्यभरात आंदोलने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने देयके माफ करण्याची तशी घोषणा केली होती; मात्र सरकारने पुन्हा घुमजाव करत वीज देयके माफ करणार नसल्याचे सांगितले. या सूत्रावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्योगपती अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत हा गौप्यस्फोट केला आहे.
सौजन्य : टी.व्ही.9 मराठी