अमेरिकेची धोरणे !

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चीनसमर्थक असल्याचे निवडणुकीपूर्वी म्हटले जात होते. त्याला त्यांची धोरणे आणि पूर्वइतिहास कारणीभूत होता. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळीही बायडेन यांनी चीनची बाजू घेतली आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या  चीनविरोधी धोरणांवर टीका केली होती. ‘बायडेन जिंकल्यास अमेरिका चीनच्या नियंत्रणात जाईल’, असा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता; मात्र हे दावे किती खोटे होते, हे बायडेन यांच्या सरकारने चीनविषयी केलेल्या विधानावरून लक्षात येत आहेत. ‘भारत आणि चीन सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी संवाद आवश्यकच आहे, त्याचे आम्ही समर्थन करतो; मात्र चीनकडून शेजार्‍यांना धमकावणे आणि दहशत पसरवणे यांमुळे आम्ही चिंतेत आहोत’, असे विधान जो बायडेन सरकारकडून करण्यात आले आहे. भारतासाठी हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून ट्रम्प यांच्या सरकारची चीनविरोधी आणि भारत समर्थक धोरणे पुढे चालू रहाणार आहेत, असे लक्षात येते.

जो बायडेन

राजकीय तज्ञांकडूनही हेच सांगण्यात येत होते की, अमेरिका चीनशी कधीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवू शकणार नाही; कारण चीन अमेरिकेसाठी प्रतिस्पर्धी देश आहे. चीनची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. तिला महाशक्ती व्हायचे आहे आणि त्यासाठी अमेरिकेला शस्त्र, अर्थ, व्यापार आदी गोष्टींत मागे टाकणे आवश्यक आहे, हे जाणून चीन वाटचाल करत आहे. हे अमेरिकेलाही ठाऊक असल्याने ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात कठोर धोरण राबवले होते. त्यातूनच ‘चीनचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने त्याने भारताला सर्व प्रकारे साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. हे धोरण अमेरिका देशासाठी कायम असणार असल्याने सत्तेवर कोणताही पक्ष किंवा व्यक्ती आली, तरी त्याला आणि तिला याच धोरणानुसार परराष्ट्रनीती ठेवावी लागेल. याला एखाददुसरा अपवाद होऊ शकतो; मात्र ते कायमस्वरूपी धोरण होऊ शकत नाही. ट्रम्प यांचे काही निर्णय बायडेन यांना चुकीचे वाटणे स्वाभाविक असले, तरी एकूण चीनविरोधी नीती अयोग्यच होती आणि ती पालटायला हवी, असे ते कदापि म्हणू शकणार नाहीत. ते अमेरिकेच्या हिताचे होणार नाही. अमेरिकेचे हे धोरण भारतातील तज्ञांना ठाऊक असल्याने भारत सरकारने आतापर्यंत एकदाही बायडेन यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांचे स्वागत केले आहे. बायडेन यांच्या सरकारने आतातरी चीनला दोन शब्द सुनावले आहेत, हेच धोरण कायम राहील, अशी अपेक्षा भारताची असेल. भारताने बायडेन सरकारला चीनमुळे त्याला कशा प्रकारच्या अडचणी येत आहेत, कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे सांगण्याची आवश्यकता आहे. कदाचित् भारताने ते चालूही केले असेल. यातून भारताची स्थिती नव्या सरकारला लक्षात येत राहील आणि भारताच्या बाजूने अमेरिकेकडून मतप्रदर्शन होईल, हा लाभ होऊ शकतो, जो भारताला चीनच्या विरोधात महत्त्वाचा ठरणार आहे.