(म्हणे) ‘छत्तीसगडमध्ये भाजपच्या खासदाराकडून माझ्या मृत्यूसाठी यज्ञ !’ – काँग्रेसच्या आमदाराचा आरोप

  • लाल मिरचीचे हवन आणि  ७ बकर्‍यांचा बळी दिल्याचा दावा

  • प्रत्युत्तरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी यज्ञ

काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्‍वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !

काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात यज्ञ करण्यावरून जुंपली आहे. काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांना मंत्री न बनवता त्यांना एका विकास प्राधिकरणावर उपसंचालक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी आरोप केला, ‘राज्यसभेतील भाजपचे एक खासदार त्यांच्या मृत्यूसाठी यज्ञ करत आहेत. गेल्या २ दिवसांपासून लाल मिरचीद्वारे हवन चालू चालू आहे. ७ बकर्‍यांचा बळीही दिला आहे.’ भाजपच्या खासदाराने मात्र हा आरोप फेटाळून लावत म्हटले, ‘यज्ञ धार्मिक विधी असतो, यज्ञ करणे चुकीचे नाही; मात्र आम्ही बृहस्पती सिंह यांच्या मृत्यूसाठी कोणताही यज्ञ केलेला नाही.’

१. यानंतर काँग्रेसमधील इतर नेत्यांनीही ‘आमच्या आमदाराच्या मृत्यूसाठी कुणी यज्ञ कसे काय करू शकतो ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत आमदारांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून यज्ञ करण्यात येत आहे.

२. यावरून भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘आमदार स्वत:च्या मतदारसंघात रस्ते बनवू शकले नाहीत; पण यज्ञ करण्यासाठी सिद्धता करत आहेत.’