उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देणे, विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि ध्वजसंकलन अभियान

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ

वाराणसी – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ जानेवारीच्या निमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांना समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

१. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याचे मास्क यांची विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी वाराणसी येथील जिल्हाधिकारी, आयुक्त मंडळ अन् वरिष्ठ पोलीस अधीक्षक; सैदपूर, गाझीपूर येथील उपजिल्हाधिकारी, अयोध्या येथील जिल्हाधिकारी, आयुक्त मंडळ आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. तसेच बिहारमधील हाजीपूर, समस्तीपूर, मुजफ्फरपूर आणि गया येथील  जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले.

२. या चळवळीला प्रशासनाचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी संबंधित अधिकार्‍यांनी ‘राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी’, यासाठी संबंधित पोलीस ठाणे आणि मंडल यांना निर्देश दिले.

३. विविध जिल्ह्यांमध्ये विद्यालये आणि महाविद्यालय येथे जाऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले.

४. सैदपूर येथे आयोजित बालसंस्कारवर्गामध्ये राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करण्यात आले.

५. ध्वजारोहणानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा केले आणि त्यानंतर ते पोलीस ठाण्यामध्ये जमा केले. या अभियानाला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.