अनेक अनुभूती देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असलेला चैतन्यदायी रामनाथी आश्रम !

अनेक अनुभूती देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन असलेला चैतन्यदायी रामनाथी आश्रम अन् साधनेचे अमूल्य दृष्टीकोन देणारा संतसत्संग !

वर्धा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मंदाकिनी डगवार त्यांच्या यजमानांसह मे २०१७ मध्ये रामनाथी आश्रमात आल्या होत्या. आश्रमात आल्यावर सौ. डगवार यांना आलेल्या अनुभूती, तसेच संतसत्संगात त्यांना मिळालेले अमूल्य ज्ञान यांविषयी पुढे देत आहे. त्याचप्रमाणे श्री. विजय डगवार यांनी आश्रम व्यवस्थापनाच्या संदर्भात टिपलेली सूत्रे आणि त्यांनी दिलेला वैशिष्ट्यपूर्ण अभिप्रायही पुढे देत आहे.

रामनाथी आश्रम

१. रामनाथी आश्रमात जायचे नियोजन झाल्यावर ‘त्याच काळात मुलीचे शस्त्रकर्म होणार आहे’, हे कळल्यामुळे जाण्याविषयी संभ्रम निर्माण होणे आणि यजमानांनी सकारात्मकता दर्शवल्याने आश्रमात येण्याची संधी मिळणे

‘मे २०१७ मध्ये आमचे रामनाथी आश्रमात जाण्याचे निश्‍चित होत होते. त्याच वेळी आम्हाला समजले, ‘आम्ही ज्या वेळी आश्रमात जाणार आहोत, त्याच कालावधीत मयुरीच्या (मुलीच्या) मणक्याचे शस्त्रकर्म होणार आहे.’ त्यामुळे आम्हाला ‘जावे कि नाही ?’, असा प्रश्‍न पडला. तेव्हा देवाला (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘देवा, मी अज्ञानी आहे. मला काही कळत नाही आणि निर्णयही घेता येत नाही. तुला अपेक्षित असेच सर्वकाही घडू दे. तू सतत माझ्याजवळ असतोस. त्यामुळे माझी रामनाथी आश्रमात येण्याची आणि तुला भेटण्याची इच्छा राहिली नाही. ‘देव समवेतच आहे’, याची प्रचीती दिल्यामुळे मी कृतज्ञ आहे.’ देवाच्या कृपेने यजमानांनी गोव्याला येण्याविषयी सकारात्मकता दर्शवली आणि निघण्याच्या आदल्या दिवशी आमच्या जाण्याचे नियोजन होऊन रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली.

सौ. मंदाकिनी डगवार

२. आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

२ अ. सर्वत्र पुष्कळ चैतन्य जाणवून २ घंटे झोप होऊनही दिवसभर उत्साही वाटणे : आम्ही आश्रमात रात्री ३ वाजता पोचलो. स्थानकावरून आश्रमाकडे येतांना ‘सर्वत्र चैतन्याचे गोळे दिसत आहेत’, असे जाणवले. नंतर आश्रमात केवळ २ घंटे झोप होऊनही मला दिवसभर उत्साही वाटत होते. आश्रमात सर्वत्रच पुष्कळ चैतन्य आहे. ‘येथील भिंतीही जिवंत भासून ‘त्या माझ्यावर उपाय करत आहेत’, असे वाटत होते.

२ आ. ‘संतांमधील चैतन्यामुळे उपाय होऊन भाव जागृत होणे : येथील चैतन्यामुळे मला कोणतेही शारीरिक दुखणे जाणवले नाही. अधूनमधून मार्गिकेतून जातांना संतदर्शन होऊन त्यांच्यातील चैतन्यामुळे उपाय होऊन माझा भाव जागृत होत होता. ‘संतांमधील नम्रता, स्वावलंबन आणि प्रेमभाव आदी गुणांचे दर्शन होऊन ‘मी किती न्यून पडते’, याची मला जाणीव होत होती.

२ इ. त्रास असूनही आनंदी रहाणार्‍या साधिकांकडून त्यांचे अनेक गुण शिकायला मिळणे : आश्रमातील साधकांच्या तोंडवळ्यावरील आनंद, त्यांचा प्रेमभाव आणि स्वतःला पालटण्याची तळमळ बघून पुष्कळ आनंद होत होता. त्रास असणार्‍या साधिकाही पुष्कळ आनंदी असतात. त्या एकमेकांना साहाय्य करतात आणि त्रास न्यून होण्यासाठी सतर्कतेने उपाय करतात. त्या देवाला शरण जाऊन लढतात. त्यांच्याकडून प्रेमभाव, सतर्कता, शिकण्याची वृत्ती, प्रांजळपणा आणि विचारण्याची वृत्ती हे गुण शिकायला मिळाले.

२ ई. चैतन्य देणारा लागवड विभाग

२ ई १. ‘झाडे साधना करत आहेत’, असे वाटणे आणि उपाय होऊन आवरण न्यून होणे : लागवडीत जातांना माझा भाव जागृत होत होता. ‘सर्वत्र पुष्कळ चैतन्य असून त्या चैतन्यात मी न्हाऊन निघत आहे. झाडे साधना करून सर्वांना सत्संग देत आहेत’, असे मला वाटत होते. फळांनी लगडलेली झाडे नम्र होऊन सर्वांना फळे देतात, तसेच आपणही नम्र असावे आणि इतरांना आनंद द्यावा’, असे मला वाटले. तेथे माझ्यावर पुष्कळ उपाय झाले आणि आवरण न्यून होऊन हलके वाटले.

२ ई २. अगदी वरच्या भागात ‘शेषशायी नाग आणि त्या खाली श्रीविष्णु म्हणजे प.पू. गुरुदेव आहेत’, असे जाणवणे : लागवड विभागात अगदी वरच्या टोकापर्यंत गेल्यावर ‘५ फण्यांचा शेषशायी नाग आणि शेषशायी नागाच्या खाली श्रीविष्णु, म्हणजे प.पू. गुरुदेव आहेत. त्यांच्या चरणांशी सर्व साधक आनंद अनुभवत आहेत’, असे मला जाणवले.

२ ई ३. बालसाधक वेदांतने झाडांची माहिती तळमळीने सांगितल्याने जिज्ञासा वाटणे : आश्रमातील बालसाधक वेदांत झाडांची माहिती अगदी मनापासून आणि तळमळीने सांगत होता. संतांनी लावलेल्या झाडांचे महत्त्व सांगतांना त्याची तळमळ आणि त्याचा भाव बघून माझी जिज्ञासा वाढली. त्या वेळी मला ‘लहान कृतीतून आनंद कसा घ्यायचा ?, जिज्ञासा जागृत कशी ठेवायची ?’, हे शिकायला मिळाले.

२ उ. देवतांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवणारे ध्यानमंदिर !

२ उ १. प्रकाशमय आणि चैतन्यदायी वातावरण : ‘ध्यानमंदिरात काही वेळा पिवळा, तर काही वेळा निळा प्रकाश पसरला आहे’, असे मला वाटले. ‘तेथील चैतन्य श्‍वासासह देहातील प्रत्येक पेशीत जात आहे’, असेही मला वाटत होते.

२ उ २. शक्ती प्रदान करणारी श्री भवानीदेवी : ‘तेथे देवतांचे प्रत्यक्ष अस्तित्व जाणवून ‘देवता स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवले. श्री भवानीदेवी मला म्हणाली, ‘मी तुझ्या माहेरची कुलदेवी आहे. लग्नानंतरही तुला शक्ती देऊन मी तुझे रक्षण करत आहे.’ ‘देवी सतत माझ्या समवेत असते’, असे मला वाटले.

२ उ ३. संत भक्तराज महाराज : ‘संत भक्तराज महाराज बोलत आहेत आणि त्यांचे डोळे अन् ओठ यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.

२ ऊ. पू. सौरभदादांच्या खोलीत सुगंध येणे : पू. सौरभदादांच्या खोलीत पुष्कळ सुगंध येत होता. त्यांच्या चरणांना स्पर्श केल्यावर शक्ती जाणवली आणि हलके वाटले. त्यांना ‘येऊ का ?’, असे विचारल्यावर ते ‘बसा’, असे म्हणत होते. तेव्हा मला ‘मी त्यांच्या चरणांशी लहान होऊन बसले आहे’, असे वाटले.

२ ए. श्री दुर्गादेवीची मूर्ती पहातांना स्वतःतील शक्तीतत्त्व जागृत होत असल्याचे जाणवणे : श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करत असलेल्या ठिकाणी पुष्कळ सुगंध येत होता. मूर्ती पूर्ण सिद्ध व्हायची असूनही ‘मूर्तीतून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होत आहे. मूर्तीसमोर उभे राहिल्यावर माझ्यातील शक्तीतत्त्व जागृत होत आहे’, असे मला जाणवले.

२ ऐ. बगलामुखी यज्ञासाठी फुले निवडतांना ‘ती आनंदी आहेत’, असे वाटणे आणि ‘आम्हाला फुलांप्रमाणे सुगंधी बनव’, अशी देवाला प्रार्थना होणे : बगलामुखी यज्ञासाठी मला फुले निवडायची सेवा मिळाली. त्या वेळी ‘ती दैवी फुले असून त्यांची पुष्कळ साधना असल्याने ती देवाच्या चरणांशी अर्पण होत आहेत’, असे मला वाटत होते. ‘फुले पुष्कळ आनंदी असून एकेक फूल परडीत ठेवतांना ‘ते आनंदाने उड्या मारत आहे’, असे वाटत होते. तेव्हा प्रार्थना होत होती, ‘देवा, तू आम्हाला या फुलांप्रमाणे बनव. या फुलांमध्ये जशी तळमळ, कोमलता, टवटवीतपणा आणि सुगंध आहे, तसे आम्हालाही बनव अन् तुझ्या चरणी अर्पण करून घे.’ ही सेवा झाल्यावर दिवसभर हाताच्या बोटांना आणि कपड्यांना पुष्कळ सुगंध येत होता.

३. संतांनी दिलेले साधेनेचे अमूल्य दृष्टीकोन !

आम्हाला अन्य साधकांसह संतांना भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून मिळालेले साधेनेचे अमूल्य दृष्टीकोन आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.

३ अ. व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे जायला हवे ! : आम्ही भेटीच्या कक्षात बसलो असतांना संतांना बघून एका साधकाचा भाव जागृत होऊन तो मोठ्याने रडू लागला. ते पाहून संत म्हणाले, ‘‘साधना चांगली चालू आहे. पुढे जाणार आहात. आता व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे जायला हवे. ईश्‍वराप्रती भाव असल्यास स्वभावदोष दूर होतात. अव्यक्त भावात राहिल्यास सेवा चांगली होईल !’’

३ आ. जन्म, मृत्यू आणि विवाह या घटना प्रारब्धाधीन असल्याने मुलाच्या लग्नाची काळजी न करता स्वयंसूचनांचे साहाय्य घेऊन स्वेच्छेकडून परेच्छेकडे जायला हवे ! : एका साधकाने सांगितले, ‘‘समाजातील लोक मुलाच्या लग्नाविषयी विचारतात. ‘मुलाचे लग्न व्हायला हवे’, असे वाटून मला त्याच्या लग्नाची काळजी वाटते.’’ यावर संत म्हणाले, ‘‘न्यायालयात केस चालू असतांना आपण अधिवक्त्यांचा समादेश घेतो. तेव्हा ‘समाज काय म्हणेल ?’, याचा विचार करत नाही. ‘देवाचे ऐकायचे कि समाजाचे ?’, हे आपण ठरवायला हवे. मुलगा आश्रमात साधना करत असल्याने त्याची काळजी करायला नको. तो देवाच्या चरणी जाणार आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह या घटना प्रारब्धाधीन असतात. ‘विवाह व्हावा’, असे वाटणे, ही ‘स्वेच्छा’ झाली. यातून ‘परेच्छा’ आणि ‘ईश्‍वरेच्छा’ येथपर्यंत जाण्यासाठी स्वयंसूचना द्याव्यात. स्वयंसूचनेमुळे हा विचार अंतर्मनातून जाण्यासाठी लाभ होईल. त्यानंतर मन स्थिर होऊन समाजातील लोक काहीही म्हणाले, तरी काही वाटणार नाही.’’

३ इ. साधनेमुळे सत्त्व गुणाचे आवरण निर्माण होणे : एका साधकाला भेटीच्या वेळी पुष्कळ घाम आला. त्या वेळी संतांनी सांगितले, ‘‘घाम आला, म्हणजे आवरण गेले. साधनेमुळे सत्त्व गुणाचे कवच निर्माण होईल.’’

३ ई. भगवंताचा ‘व्यापकत्व’ हा गुण येण्यासाठी साधना करायला हवी ! : एक साधक म्हणाले, ‘‘तुम्ही ‘संसारात राहून सेवा करा’, असे सांगितले आहे. यावर संत म्हणाले, ‘‘मायेचे रूप संपल्याविना देवाचे रूप दिसत नाही. कर्तव्याची व्याप्ती मोठी आहे. भगवंताचा ‘व्यापकत्व’ हा गुण आपल्यात यायला हवा. साधनेनेच व्यापकत्व येणार आहे !’’

३ उ. स्वयंसूचना सत्रे होत नसल्यास शिक्षापद्धत अवलंबायला हवी ! : एका साधकाने त्याची अडचण सांगितली, ‘‘माझ्याकडून चुकांचे लिखाण होते; पण स्वयंसूचनेचे सत्र करण्याचे लक्षात रहात नाही. सूचना करतांना काहीच सुचत नाही.’’ त्या वेळी संतांनी सांगितले, ‘‘सूचना घ्यायला सुचत नाही, हे चुकीचे आहे. मन ऐकत नसल्यास प्रायश्‍चित्त घ्यायला हवे. प्रायश्‍चित्ताच्या भीतीने तरी प्रयत्न होतील. बुद्धीला कळते; पण अंतर्मनाला कळत नाही, तोपर्यंत स्वयंसूचना द्यायची. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना प्रायश्‍चित्त वाढवत न्यायचे, म्हणजे प्रायश्‍चित्ताच्या भीतीने तरी मन ऐकते.’’

– सौ. मंदाकिनी डगवार, वर्धा, महाराष्ट्र (२.५.२०१७)


चैतन्य आणि ईश्‍वराचे अस्तित्व यांचा अनुभव देणारा रामनाथी आश्रम !

श्री. विजय डगवार

अ. उत्कृष्ट व्यवस्थापन : ‘आश्रमाचे व्यवस्थापन उत्तम आणि सुनियोजित आहे. नियोजित वेळेत सर्व साधकांचे भोजन आणि अल्पाहार होतो. सर्व साधकांची निवासव्यवस्था, सेवा, सत्संग, उपाय, नामजप आणि उपचार या सर्वांची काळजी घेणे, तसेच स्वतःच्या चुका लिहिणे, असे अन्य ठिकाणच्या व्यवस्थापनात शिकवले जात नाही.

आ. आश्रम म्हणजे वास्तूकलेचे उत्तम उदाहरण ! : अल्प आणि डोंगराळ जागेत आश्रमाच्या वास्तूची रचना,  पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, लागवड, अंतर्गत रस्ते, सुशोभीकरण इत्यादी सोयींनी युक्त असलेले हे बांधकाम सध्याच्या आणि नियोजित वास्तूकलेचे उत्तम उदाहरण आहे. या बांधकामाची गुणवत्ता उत्तम आहे. आश्रमात पुष्कळ स्वच्छता आणि शांतता आढळते.

इ. शिस्तप्रिय साधक : हे ईश्‍वरी कार्य असल्याने येथील साधक प्रामाणिकपणे सेवा करतात. सर्व साधक शिस्तप्रिय असून येथील सेवापद्धत अचूक आहे. साधकांमधील प्रेमभाव आणि इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे.

ई. अनोखी साधना : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेची पद्धत, तसेच स्वयंसूचना सत्र करणे, हे सगळे अनोखे आहे.

उ. अनुभूती : संपूर्ण आश्रमात चैतन्य आणि ईश्‍वराचे अस्तित्व अनुभवले.

ऊ. वैशिष्ट्यपूर्ण शेरा : हिंदु राष्ट्रातील आस्थापन, तसेच अध्यात्म, कौशल्य आणि विकास यांकरीता रामनाथी आश्रमाला ‘आय्.एस्.ओ. (I.S.O.)’ चे मानांकन मिळण्यात कुठलीही उणीव राहिली नाही’, असे मला वाटते.’

– श्री. विजय बा. डगवार, वर्धा, महाराष्ट्र. (२.५.२०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक