|
नांदेड – साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेले श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवीच्या मंदिरात एकही महिला पुजारी नाही. देवीला अभिषेक घालणे, साडी नेसवणे, मंगळसूत्र घालणे या कृती पुरुष पुजारी करतात. त्यामुळे तेथे ५० टक्के महिला पुजारी हव्यात, अशी मागणी मंदिर विश्वस्तांकडे करण्यात आली आहे. मंदिरात महिला पुजारी नेमून राज्यात आदर्श निर्माण करावा. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे विधान भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी २७ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले. (मंत्रोच्चारांमुळे गाभार्यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्यात जाण्यास मनाई असते; मात्र स्त्रिया मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेऊ शकतात. तृप्ती देसाई या हिंदु धर्मशास्त्राचा अशा प्रकारे अभ्यास करण्याचे कष्ट घेतील का ? मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांचा रजोगुण वाढलेला असतो. अशा स्थितीत महिलांनी गाभार्यात प्रवेश केल्यास त्या रजोगुणाचा स्त्रियांसह इतरांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी महिलांना मंदिरात प्रवेश नसतो. महिलांनी गाभार्यात प्रवेश करावा कि नाही ? हे ठरवण्याचा अधिकार हिंदु धर्मातील जगद्गुरु शंकराचार्य, धर्मपंडित, संत यांना आहे. पुरोगामी किंवा नास्तिकतावादी असणार्यांना मंदिराविषयी बोलण्याचा काय अधिकार ?- संपादक)
त्या पुढे म्हणाल्या, महिलांना मासिक पाळी येत असल्याने त्यांना पुजारी म्हणून घेतले जात नाही; पण स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. ही आंदोलनाची भूमिका असून माहूर येथील महिला नगरसेविकांसमवेत याची चर्चा करण्यात आली. मंदिराच्या विश्वस्तांमध्येही महिलांचा समावेश झाला पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.
सौजन्य : टी.व्ही. 9 मराठी
ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या वतीने तृप्ती देसाई यांच्या छायाचित्राला जोड्याने बडवून निषेध !
पुणे – भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी राज्यातील देवीच्या मंदिरांत महिला पुजारी असाव्यात, अशी मागणी केली आहे. या मागणीला ब्राह्मण महासंघ महिला आघाडीने विरोध केला आहे. २८ जानेवारी या दिवशी पुण्यातील सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर ब्राह्मण महासंघ महिला आघाडीने तृप्ती देसाई यांच्या छायाचित्राला काळे फासून आणि जोड्याने बडवून निषेध आंदोलन केले.