सातत्याने भावस्थितीत राहून कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर आधार देणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी !

सातत्याने भावस्थितीत राहून कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर आधार देणार्‍या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ८८ वर्षे) !

पू. (श्रीमती) मंगला खेर

१. प्रत्येक कृतीत सातत्य असणे

पू. मंगला खेरआजी यांचा नित्यक्रम पुढीलप्रमाणे असतो.

अ. पू. आजी प्रतिदिन उठल्यावर भूमातेला डोके टेकवून नमस्कार करतात. कराग्रे वसते लक्ष्मी … हा श्‍लोक म्हणून हातांचे दर्शन घेऊनच अंथरुणातून उठतात.

आ. त्या सकाळी सूर्यदेवता आणि दारात असलेली गोमाता यांचे दर्शन घेऊन नमस्कार करतात.

इ. त्या प्रतिदिन प्राणायाम, व्यायामाचे प्रकार आणि श्‍लोक म्हणणे, असे सर्व करून श्री विष्णवे नमः । हा नामजप चालू करतात.

ई. पू. आजींच्या समष्टी नामजपात कधीही खंड पडत नाही. त्या नामजप वेळेत चालू करून वेळेत पूर्ण करतात. सर्व उपाय वेळच्या वेळी करतात. त्या सतत देवाच्या अनुसंधानात असतात. सतत प्रार्थना करतात. देवता त्यांच्या समवेत असतात, असे मला नेहमी वाटते.

उ. कोरोनाच्या महामारीमुळे स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठीचा नामजप अन् बगलामुखी स्तोत्र ऐकतांना त्या सर्व अवयवांवर न्यास करून देवीला नमस्कार करतात. त्या सर्व देवता आणि दिशा यांना स्थुलातून नमस्कार करतात.

सौ. मीनल खेर

२. प्रेमभाव

अ. पू. आजींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्यासमोर भारद्वाज पक्षी, चिमण्या इत्यादी पक्षी आणि मुंगूसही अगदी सहजपणे येऊन बसतात. त्यांचे येणे शुभशकुन असल्याचे मला जाणवते.

आ. पू. आजींमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करतात. कुणी साधक आला, तर त्याच्या घरातील लहान मुलांची नावे घेऊन त्यांच्याही चौकशा करतात. त्या आलेल्यांना काहीतरी खाऊ दिल्याविना पाठवत नाहीत. शेजारच्या इमारतीतील कोणी व्यक्ती दिसल्या नाहीत किंवा कोणाला बरे नसेल, तर पू. आजी आवर्जून त्यांची चौकशी करायला सांगतात.

इ. पू. आजींना भ्रमणभाषवर कोणी अडचणीचे प्रसंग सांगितले, तर  त्या सांगतात, आपण देवाचे नामस्मरण करायचे. तो आपले सर्व प्रसंग निभावून नेतो. श्रद्धेने नामस्मरण करा. भक्तासाठी देव धावून येतो. याविषयी आपण पुराणातील कहाण्या वाचतो ना ? देवाला तुमचे मन हवे असते. त्यामुळे सर्वांना पू. आजींचा आधार वाटतो.

३. सहनशीलता

पू. आजींकडे सहनशीलता हा गुण अधिक आहे. कितीही मोठा प्रसंग आला, तरी त्या तो उत्तम हाताळतात.

४. कुटुंबियांचा आधार असणे

पू. आजींमुळे आम्हाला घरातील व्यवहार आणि साधना यांची सांगड घालता येते. घरातील आम्हा सर्वांचे प्रारब्ध तीव्र आहे; परंतु ते सुसह्य करण्यामध्ये पू. आजींचा आम्हाला पुष्कळ आधार आहे, असे जाणवते. माझे यजमान श्री. मिलिंद खेर (पू. आजींचा मुलगा) अडीच मास देवद आश्रमात होते. त्या वेळी आलेल्या व्यावहारिक अडचणींमध्ये पू. आजींमुळे घरातील वातावरण आनंदी होते. त्यांच्यामुळेच त्या काळातही माझी व्यष्टी अन् समष्टी साधना चांगली झाली.

५. पू. आजींची अनुभवलेली कृपा

अ. पू. आजींच्या कृपेने आजारातून सहज बरे होणे : माझी वहिनी ज्योतिषशास्त्राची अभ्यासक आहे. एकदा तिने पू. आजींचा हात पाहिला आणि ती म्हणाली, पू. आजींना १०० वर्षे आयुष्य आहे. मीही तिला माझा हात दाखवला. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या आजारपणात पू. आजींनाच तुमचे सारे करावे लागेल. तेव्हापासून माझ्या प्रार्थना होऊ लागल्या, देवा, मी पू. आजींची सेवा करीन; परंतु त्यांना माझी सेवा करायला लावू नकोस. अनेकदा मी रुग्णाईत असतांना त्या माझी स्थुलातून नाही; पण सूक्ष्मातून सेवा करतात. त्यांच्यामुळे मी लहान-मोठ्या आजारांतून सहजपणे बरी होते.

आ. पू. आजींच्या कृपेने सेवेची संधी मिळणे : पूर्वी पू. आजी आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजप करत असत. त्यामुळे त्या साधकांचे त्रास दूर झालेले जाणवतात. अजूनही त्या सर्वांची चौकशी करतात. साधकांचे निरोप पू. आजींना देणे आणि साधकांना पू. आजींचे निरोप पोचवणे, ही सेवा मला पू. आजींच्या कृपेने मिळाली आहे.

६. अभ्यासूवृत्ती आणि आज्ञापालन

पू. आजी केंद्रातील साधकांचा आढावा ऐकतात. साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली चालू आहे, असे त्या म्हणतात. त्या सत्संग, भावसत्संग, सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन नियमित ऐकतात आणि त्याप्रमाणे कृती करतात.

७. ग्रंथ आणि दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचन करणे

​विश्रांतीच्या वेळी त्या समवेत असलेल्या ग्रंथाचे वाचन करतात. दळणवळणबंदीच्या काळात आमच्याकडे दैनिक सनातन प्रभात येत नव्हते. तेव्हा त्यांना महत्त्वाच्या वार्ता आणि साधनेविषयी माहिती असणारे सदर वाचून दाखवावे लागत होते. त्यांना दैनिक वाचनाची पुष्कळ सवय झालेली आहे. दैनिक सनातन प्रभातची रत्नागिरी आवृत्ती केव्हा चालू होणार ?, याची त्या सतत विचारणा करायच्या.

८. भाव

सकाळी आमच्या घरात सूर्यकिरण आतपर्यंत येतात आणि सायंकाळी देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांवर पडतात. त्या वेळी पू. आजी म्हणतात देवाची किती कृपा आहे ! देव घरात आतपर्यंत येतो.

९. गुरुदेवांवरील श्रद्धा

प्रत्येक वेळी प.पू. गुरुमाऊली आहे, हे एकच वाक्य त्या सतत सर्वांना सांगत असतात. यावरून त्यांची गुरूंवरील श्रद्धा लक्षात येते. गुरुमाऊली या शब्दानेही त्यांना पुष्कळ आधार वाटतो.

१०. पू. आजींनी सांगितलेले आध्यात्मिक दृष्टीकोन आणि त्यांची देवावरील दृढ श्रद्धा

अ. त्रास न्यून झाल्यावर देव साहाय्य करत असल्याचे जाणवते, असे पू. आजींनी सांगणे : कोरोनाच्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी साधकांना उपयुक्त नामजप सांगितलेला आहे. पू. आजींमुळे आमचा तो नामजप चांगला होतो. नामजप करत असतांना प्रत्यक्ष श्री दुर्गादेवी अनिष्ट शक्तींशी लढत असतांनाचे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. त्याच वेळी श्री. मिलिंद खेर देवद आश्रमात ध्यान लावून बसले असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ज्ञान दिले, असे दृश्य श्री. मिलिंद खेर यांना दिसले. हे दोन्ही प्रसंग पू. आजींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, तीव्र प्रारब्ध असल्यामुळे देव साहाय्य करत आहे, हे आपल्याला समजत नव्हते. त्रास न्यून झाल्याने हे दिसले.

आ. पू. आजींनी देव आपल्या समवेत असून तोच सर्व करत आहे, याची जाणीव सतत करून देणे : देवच सर्व करत आहे. प्रत्येक प्रसंगाकडे त्याचे लक्ष आहे. देव आपल्या समवेतच आहे, असे पू. आजी सतत सांगत असतात. घरात काही अडचण आल्यावर पू. आजींना शारीरिक त्रास होतो. तेव्हा वैद्य मंदार भिडे त्यांना तपासतांना सांगतात, तुमचा सर्व त्रास पू. आजी संपवत आहेत.

इ. नेहमी मार्च मासात खारट होणार्‍या विहिरीच्या पाण्याचा खारटपणा न्यून होणे आणि या द्वारे ईश्‍वरी राज्य येणार असल्याच्या खुणा देव दाखवत आहे, असे पू. आजींनी सांगणे : मार्च ते मे मासापर्यंतच्या कालावधीत समुद्राच्या पाण्याच्या झिरपण्यामुळे आमच्या सोसायटीतील विहिरीचे पाणी खारट होते. (समुद्राच्या जवळ आमची सोसायटी आहे.) या वर्षी त्याचा खारटपणा न्यून झाला आहे. त्या वेळी पू. आजी म्हणाल्या, सर्वांची साधना चांगली होत आहे. गंगामाता शुद्ध होत आहे. पापक्षालन झाल्यावर पुनःश्‍च हरि ॐ म्हणजे सर्व पूर्ववत होईल. ईश्‍वरी राज्य येणार आहे. त्याच्या या खुणा देव दाखवत आहे. आपण साधना करत रहायचे. बाकीचे सर्व देव करतो.

११. पू. आजींचे आध्यात्मिक स्तरावरील चैतन्य कार्यरत असणे

अ. पू. आजी स्वतः रुग्णाईत असल्यावर वैद्यकीय उपायांसह सर्व आध्यात्मिक उपाय, उदा. नामजप करणे, कापूर-अत्तर, मीठ-पाण्याचे उपाय इत्यादी नियमित करतात.

आ. पू. आजींना या वयातही (८८ व्या वर्षीही) कसलेही पथ्य नाही. त्या सर्व प्रकारचे जेवण (पदार्थ) ग्रहण करतात. त्यांना कमी आहार आणि तोही वेळेत मिळणे, एवढेच आवश्यक असते. पूर्वी त्यांना रक्तदाबाची गोळी घ्यावी लागत होती. आता तीही घ्यावी लागत नाही. तेव्हा त्यांच्यामध्ये ईश्‍वरी चैतन्य कार्यरत आहे, असे मला जाणवते.

१२. अनुभूती

अ. आमच्या घरात त्रासाचा भाग वाढला असेल, तेव्हा मला श्री महाकाली; व्यावहारिक अडचण असेल, तेव्हा श्री महालक्ष्मी आणि ज्ञानाच्या वेळी श्री सरस्वती देवी, या तीनही देवी आजींच्या समवेत असल्याचे दर्शन होते.

आ. या सूत्रांचे लिखाण करतांनाही मला स्थानदेवता असलेल्या नागदेवतेची शीळ ऐकू येत आहे.

१३. पू. आजींच्या देहामध्ये झालेले पालट

अ. दृष्टी शून्यात गेल्यासारखी वाटते.

आ. पू. आजींचा तोंडवळा लहान बालकासारखा दिसतो.

इ. पू. आजींचे हात, पाय आणि तोंडवळा गुलाबी झाला आहे.

ई. त्यांच्या कपाळावर कमळाच्या फुलाच्या पाकळ्यांचा आकार उमटल्याप्रमाणे दिसतो.

उ. त्यांची त्वचा मऊ आणि गुळगुळीत झाली असून तिला चकाकी आली आहे.

ऊ. पू. आजींची प्रकृती बरी नसतांना मी त्यांचे केस विंचरण्याची सेवा करत होते. तेव्हा त्यांचे केस चकाकत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांच्या केसांचा स्पर्श हाताला मुलायम लागत होता.

ए. पू. आजींकडे पहातांना एक वेगळेच तेज जाणवते.

– सौ. मीनल मिलिंद खेर (पू. आजींची सून), रत्नागिरी (२१.११.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक