शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्‍यांना चपराक !

काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण

नवी देहली – देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. काही लोकांनी रवनीत सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या वाहनापर्यंत सुरक्षितपणे नेले. रवनीत सिंह गाडीत बसल्यानंतरही काही जणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, असा आरोप रवनीत सिंह यांनी फेसबूकद्वारे केला आहे. रवनीत सिंह जनसांसद कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी आंदोलनस्थळी गेले असता हा प्रकार घडला. या घटनेच्या वेळी त्यांच्यासमवेत अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह आणि आमदार कुलबीर सिंह हेही उपस्थित होते.

 (सौजन्य : MIRROR NOW)

रवनीत सिंह यांनी म्हटले की, काही समाजकंटकांचा हेतू चुकीचा आहे. त्यांनी आमच्यावर आक्रमण करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणामागे शेतकरी असण्याचा प्रश्‍नच नाही. कुणीतरी जाणुनबुजून हे आक्रमण केले आहे, असाही दावा त्यांनी केला.

शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तान्यांचा सहभाग ! – रवनीत सिंह यांचा आरोप

रवनीत सिंह

रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, आम्ही खलिस्तानी झेंडे आणि घोषणा यांना घाबरणारे नाही. ते नक्षलवादी आणि खलिस्तानी फुटीरतावादी विचारांचे आहेत. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी खलिस्तानी झेंडा फडकावण्यासाठी लोकांना १ कोटी ८० लाख रुपयांचे आमीष दाखवण्यात आले आहे, असा दावाही त्यांनी केला.