आपत्काळात सत्त्वगुणी समाजाच्या रक्षणाचे नेतृत्व प्रथमोपचारक साधकांनी करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

प्रथमोपचार प्रशिक्षण प्रगत ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय शिबिर

फोंडा (गोवा) – द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळ जवळ आला असून त्यापाठोपाठ तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता दिसत आहे. या काळात सत्त्वगुणी समाजाचे अर्थात् सज्जन, साधक आणि संत यांचे रक्षण करण्यासाठी स्वत: प्रथमोपचार शिकून तो समाजाला शिकवणे, ही काळानुसार ५० टक्के महत्त्व असलेली तारक रूपाची साधना आहे. ईश्‍वराने सोपवलेले सत्त्वगुणी समाजरक्षणाचे नेतृत्व प्रथमोपचारक साधकांंनी साधना म्हणून करावे, असे मार्गदर्शन कान-नाक-घसा तज्ञ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते समितीच्या वतीने १६ आणि १७ जानेवारी या दिवशी आयोजित केलेल्या प्रथमोपचार प्रशिक्षण प्रगत ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय शिबिराच्या समारोप सत्रात बोलत होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘नेतृत्वगुण हा अनेक आध्यात्मिक गुणांचा समुच्चय आहे. नेतृत्वगुण वाढवण्यासाठी तळमळ, उत्साह आणि सकारात्मकता ही गुणांची त्रिसूत्री व्यष्टी अन् समष्टी साधना यांच्याकरता महत्त्वाची आहे. या तीन गुणांपैकी एक गुण वाढवण्यासाठी प्रयत्न केले की अन्य दोन गुण आपोआप वाढतात. तसेच यापैकी एखाद्या गुणात घट झाली की अन्य दोन गुणही न्यून होतात. साधकांनी नेतृत्वगुण वाढवून सत्त्वगुणी समाजाचे रक्षण करण्याचे प्रयत्न केल्यास प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमातून शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल.’’

या प्रथमोपचार शिबिरात वास्तविक घडलेले प्रसंग, प्रश्‍नावली, तसेच दैनंदिन जीवनात नियमित घडणारे छोटे प्रसंग यांच्या माध्यमातून प्रथमोपचार हा विषय स्पष्ट करण्यात आला. कोरोनामुळे असलेल्या दळणवळण बंदीच्या काळात साधकांकडून प्रथमोपचार प्रसाराचे झालेले चांगले प्रयत्न अन् त्याला समाजाकडून मिळालेला उदंड प्रतिसाद यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शिबिरार्थींनी आपल्या प्रथमोपचार अभ्यासाबाबत असलेल्या शंकांचेही निरसन करून घेतले. मागील ३ वर्षे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होणारे हे शिबिर या वर्षी दळणवळण बंदीमुळे ऑनलाईन होऊनही ते अत्यंत उत्साही, आनंदी आणि चैतन्यमय वातावरणात झाले.

या शिबिरात डॉ. दुर्गेश सामंत, डॉ. (श्रीमती) मृणालिनी भोसले, डॉ. (सौ.) अश्‍विनी देशपांडे, डॉ. (सौ.) साधना जरळी, डॉ. (सौ.) ममता देसाई, डॉ. (सौ.) नम्रता कुट्रे, सौ. ज्योत्स्ना नारकर, सौ. विदुला देशपांडे, सौ. मीनाक्षी पाटील, सौ. अनुश्री गावस्कर यांनी प्रथमोपचारासंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. ‘काळानुसार प्रथमोपचार उपक्रमाला गती देण्यासाठी करावयाचे प्रयत्न’ या विषयावर श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन डॉ. (सौ.) पूनम शर्मा यांनी केले, तर शिबिराचा उद्देश कु. सरिता मुगळी यांनी सांगितला.

क्षणचित्रे

१. प्रथमोपचाराचा अभ्यास बारकाईने करणे, एखादा प्रसंग घडत असतांना ‘मी काय करू शकतो’, याचा विचार करणे आवश्यक आहे, याचे महत्त्व या शिबिरातून मनावर बिंबले.

२. शिबिरामुळे साधकांची अंतर्मुखता वाढून प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची सिद्धता झाली. तसेच प्रथमोपचाराचा अभ्यास आणि सराव नियमित करायला हवा, याची जाणीव झाली.

३. हे शिबिर ऑनलाईन असूनही ते प्रत्यक्ष रामनाथी येथील सनातन आश्रमात होत असून साक्षात् गुरुदेवच आपल्याला शिकवत आहेत, अशी अनुभूती अनेक साधकांना येऊन त्यांची भावजागृती झाली.

ज्ञान, भक्ती आणि कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम म्हणजे प्रथमोपचार ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रथमोपचाराशी संबंधित विषयांचे अध्ययन, अध्यापन आणि सराव करणे हा ज्ञानमार्ग आहे. या अध्ययनानुसार योग्य आणि उचित कृती करणे अर्थात् ‘योग: कर्मसु कौशलम् ।’ म्हणजेच कर्ममार्ग आहे. या कृती देवाशी अनुसंधान ठेवून शरणागत भावाने करत रहाणे म्हणजे भक्तीमार्ग आहे. यामुळे प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे, असे चैतन्यमयी मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शिबिरार्थींना केले.