जळगाव येथे ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले !

  • देशभरातील अनधिकृत प्रार्थनास्थळांची सर्व अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे !
  • अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवरही सरकारने कारवाई करणे अपेक्षित आहे !
दर्ग्याचे अतिक्रमण हटवण्यात आले.

जळगाव, २१ जानेवारी (वार्ता.) – शहरातील ख्वाजामियाँ चौकात असलेले दर्ग्याचे अतिक्रमण मुसलमान समाजातील लोकांना विश्‍वासात घेत महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटवण्यात आले. अतिक्रमण हटवल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे. गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. सकाळी ५.३० वाजता महापौर सौ. भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह येथे  होते.

सकाळी ६ वाजता मनपाच्या दोन कर्मचार्‍यांनी त्या ठिकाणी ‘दुवा पठण’ केले. त्यानंतर ते अतिक्रमण हटवण्यात आले. ख्वाजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेला जुना लोखंडी दरवाजाही काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.