प्रत्येक वेळी हिंदु देवतांचा अवमानच का ? – ओंकार शुक्ल, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष, भाजप

‘तांडव’ ‘वेब सिरीज’वर बंदी आणण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे मिरज प्रांत कार्यालयात निवेदन

नायब तहसीलदार श्री. संजय इंगळे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज (जिल्हा सांगली), २० जानेवारी (वार्ता.) – अलीकडे हिंदु देवता, राष्ट्रपुरुष यांची थट्टा करून त्यांचे विडंबन करण्याचे प्रकार वाढले आहेत. वेब सिरीज, चित्रपट, नाटके यांमधून सातत्याने हे प्रकार होत आहेत. तरी प्रत्येक वेळी हिंदु देवतांचा अवमान का ? हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक का ?, असा परखड प्रश्‍न भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख श्री. ओंकार शुक्ल यांनी उपस्थित केला. ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला मिरज प्रांत कार्यालयात देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हे निवेदन नायब तहसीलदार संजय इंगळे यांनी स्वीकारले.

नायब तहसीलदार श्री. संजय इंगळे (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना श्री. ओंकार शुक्ल (पटलावर हात ठेवलेले) आणि अन्य

या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवाआघाडीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे श्री. श्रेयस गाडगीळ, श्री. योगेश कुलकर्णी, बजरंग दल मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, शिवसेना युवासेनेचे श्री. अक्षय मिसाळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई उपस्थित होते.