आयुर्वेदानुसार आचरण करणारे, प्रेमळ आणि साधनेची ओढ असलेले वैद्य संदेश आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण !

आयुर्वेदानुसार आचरण करणारे, प्रेमळ आणि साधनेची ओढ असलेले कुर्ला (मुंबई) येथील वैद्य संदेश आणि वैद्या (सौ.) गायत्री संदेश चव्हाण !

‘वैद्य संदेश चव्हाण हे कुर्ला (मुंबई) येथे आयुर्वेदीय चिकित्सा करतात. त्याचप्रमाणे ते मणक्यांशी संबंधित त्रासांवर ‘स्पाईन इंटिग्रेशन थेरपी’ या पद्धतीनुसार उपचार करतात. गेल्या १२ वर्षांपासून मला मणक्यांचा त्रास असून अलीकडे माझे दुखणे पुष्कळ वाढले होते. त्यासाठी रामनाथी आश्रमातील वैद्य मेघराज पराडकर यांनी आम्हाला (मी आणि पत्नी सौ. प्रार्थना हिला) माझ्या उपचारांसाठी त्यांच्याकडे जाण्यासाठी सुचवले. त्याप्रमाणे आम्ही मुंबई येथील वैद्य संदेश चव्हाण यांच्या चिकित्सालयात २० दिवस राहिलो होतो. या दिवसांत मला आणि सौ. प्रार्थना हिला वैद्य संदेश अन् त्यांची पत्नी वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

वैद्य संदेश आणि वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण
श्री. प्रसाद देव

१. वैद्य संदेश चव्हाण

१ अ. रुग्णाला मानसिक आधार देणे : २८.१.२०२० या दिवशी आम्ही वैद्य संदेश चव्हाण यांंच्या मुंबई येथील चिकित्सालयात उपचारांसाठी जाण्यासाठी निघालो. प्रवासात असतांना मी वैद्य संदेश चव्हाण यांना भ्रमणभाष करून त्यांच्या चिकित्सालयाचा पत्ता विचारला. तेव्हा चिकित्सालयाचा पत्ता सांगून ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही निश्‍चिंत होऊन या. आपण १०० टक्के प्रयत्न करूया आणि कमरेच्या वेदनांचा विषय नेहमीसाठीच संपवूया.’’ आम्ही त्यांच्या चिकित्सालयात पोचल्यावर त्यांनी मला तपासले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही एक मास नाही, तर केवळ ८ दिवसांतच बरे होऊ शकाल आणि लवकरात लवकर तुम्ही गोव्याला परत जाऊ शकाल, असे आपण प्रयत्न करूया.’’ वैद्यांचे हे बोलणे ऐकून आम्हा दोघांनाही त्यांचा पुष्कळ आधार वाटला. ‘आपल्याला गुरुकृपेने योग्य वैद्य मिळाले आहेत’, अशी आम्हाला निश्‍चिती वाटली.’

– श्री. प्रसाद देव

सौ. प्रार्थना देव

१ आ. सनातन संस्थेच्या साधकांवर असलेला विश्‍वास : ‘आम्ही दोघे त्यांच्या चिकित्सालयात पोचल्यावर त्यांनी तेथील सर्व गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या अन् त्यांच्या चिकित्सालयाच्या किल्ल्या त्यांनी निःसंकोचपणे माझ्याकडे दिल्या. त्यांची ही कृती बघून मला पुष्कळ आश्यर्च वाटले. ‘स्वतःची ओळख नसलेल्या व्यक्तीकडे संपूर्ण विश्‍वासाने चिकित्सालयाच्या किल्ल्या सोपवून जाणे’, हे केवळ त्यांच्या सनातन संस्थेवर असलेल्या पूर्ण विश्‍वासामुळेच त्यांना शक्य झाले’, असे मला जाणवले. रात्री त्यांनी आमच्या जेवणाविषयी स्वतःहून विचारपूस केली.’

– सौ. प्रार्थना देव

१ इ. रुग्णाला सकारात्मक करून त्रासाशी लढायला शिकवणे

१ इ १. रुग्णाला सकारात्मक करणे : ‘इथे येण्यापूर्वी मी वेदनांमुळे २ मास झोपून होतो. त्यामुळे माझ्या मनात ‘मला असलेला मणक्यांचा त्रास दूर होण्यास बराच कालावधी लागेल’, असे नकारात्मक विचार यायचे. मुंबईला गेल्यावर वैद्य संदेश चव्हाण यांनी पहिल्या दिवसापासूनच मला ‘तुमचा त्रास लगेच पूर्णपणे बरा होईल आणि तुम्ही नेहमीप्रमाणे चालू-फिरू शकाल. काही काळजी करू नका. वेदना होणारच आहेत; पण त्याकडे फारसे लक्ष देऊ नका. ‘वेदनेला हरवायचे आहे’, हे तुमच्या मेंदूला सांगा’, असे सांगून मला सकारात्मक केले.

१ इ २. वैद्य संदेश यांच्या योग्य उपचारांमुळे पंधरा दिवसांतच पुष्कळ बरे वाटणे : इकडे येण्यापूर्वी २ मासांत मी ६० ते ७० वेदनाशामक गोळ्या घेतल्या होत्या, तरी माझे दुखणे न्यून होत नव्हते. वैद्य संदेश चव्हाण यांच्याकडे पोचल्यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘आता वेदनाशामक गोळी घ्यायची नाही. आपण करत असलेल्या उपचारांनीच तुम्ही बरे व्हाल. मला तुम्हाला केवळ बरे वाटू द्यायचे नाही, तर बरे करायचे आहे.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या उपचारांनी १५ ते २० दिवसांतच माझे दुखणे अन् त्रास ४० ते ५० टक्क्यांनी न्यून झाले. या २० दिवसांत मी केवळ ३ वेदनाशामक गोळ्या घेतल्या.

१ इ ३. नैसर्गिक वेग म्हणजे, हसणे, शिंकणे आणि खोकणे न थांबवण्यास सांगणे : मला मोठ्याने हसल्याने, शिंकल्याने किंवा खोकल्याने कमरेत तीव्र वेदना होत असत. त्यामुळे मी हसणे, शिंकणे अन् खोकणे टाळायचो. वैद्य संदेश चव्हाण मला मुद्दामहून मोठ्याने हसायला सांगायचे. त्यांनी मला सांगितले, ‘‘खोकला किंवा शिंक आल्यास ती दाबून ठेवू नका. तुमच्या मेंदूला तशी सवय झाली, तर शरिराच्या सामान्य हालचालीही करण्यास कठीण होईल आणि त्यामुळे तुमची वेदना सहन करण्याची क्षमताच न्यून होईल.’’

– श्री. प्रसाद देव

१ इ ४. ‘तुम्ही ठेवलेल्या साधनेच्या उदात्त ध्येयापुढे या वेदना अतिशय क्षुल्लक आहेत’, असे सांगून ध्येयाकडे जाण्याची प्रेरणा देणे : ‘उपचारांचाच एक भाग म्हणून त्यांनी आमच्या वैवाहिक जीवनाविषयी माझ्याकडे विचारपूस केली. त्या वेळी मी त्यांना आम्ही दोघांनी साधनेच्या दृष्टीने ठरवलेल्या ध्येयाची कल्पना दिली. त्यानंतर वैद्य संदेश श्री. प्रसाद यांच्यावर उपचार करत असतांना आम्हाला आम्ही ठरवलेल्या ध्येयाची आणि साधनेसाठी आतापर्यंत केलेल्या त्यागाची आठवण करून देत असत. ‘तुम्ही ठेवलेल्या ध्येयासमोर तुम्हाला होत असलेल्या या वेदना आणि त्रास क्षुल्लक आहेत’, असे सांगून ‘लवकरात लवकर बरे होऊन ठरवलेले ध्येय गाठायचे आहे’, याची ते आठवण करून देत असत.

१ ई. प्रांजळपणा : वैद्य संदेश यांनी आजपर्यंत कोणत्याही रुग्णाला त्यांच्या चिकित्सालयात भरती करून घेतले नव्हते. वैद्य मेघराज पराडकर यांच्या सांगण्यानुसार त्यांनी आम्हाला तेथे रहाण्यास अनुमती दिली. आम्ही तेथे रहात असतांना ३ – ४ दिवसांनी चिकित्सालयाच्या जागेच्या मालकांनी वैद्य संदेश यांना भ्रमणभाष करून आमच्याविषयी विचारणा केली. त्या वेळी त्यांनी धैर्याने त्यांना सांगितले, ‘‘आम्हाला आणखी १ – २ आठवडे लागू शकतात.’’ याविषयी आमच्याशी बोलत असतांना ते म्हणाले, ‘‘आज पहिल्यांदाच मी त्यांच्याशी इतके धैर्याने बोलू शकलो.’’

१ उ. शरिराची सर्व हालचाल योग्य प्रकारे करण्यावर वैद्यांचा अधिक भर असणे : केवळ रुग्ण म्हणून श्री. प्रसाद यांच्याकडेच नव्हे, तर प्रत्येक वेळी वैद्य संदेश अन् वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांनी माझ्या प्रकृतीचीही काळजी घेतली. माझ्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे लक्ष असायचे, उदा. वैद्यांना काही हवे असल्यास मी लगेच उठून त्यांना त्या वस्तू देण्याचा प्रयत्न करत असे. त्या वेळी ते मला म्हणालेे, ‘‘ताई, तुमची ही उठण्याची पद्धत चुकीची आहे. याने तुम्हाला त्रास होईल.’’ त्या वेळी ते मला योग्य पद्धत सांगून स्वतःची काळजी घेण्यास सांगत असत. प्रत्येक व्यक्तीचे बसणे, उठणे, झोपणे, चालणे, वाकणे इत्यादी शरिराच्या सर्व हालचाली योग्य प्रकारे होण्यावर त्यांचा भर असतो. ते म्हणाले, ‘‘शरिराची हालचाल योग्य प्रकारे केल्यास मणक्यांच्या अन् स्नायूंच्या दुखण्याचा त्रासच होणार नाही, असे आश्रमातील सर्वच साधकांना सांगा.’’

१ ऊ. कंबर दुखत असतांना त्वरित तिच्यावर उपचार करणे : एक दिवस माझी कंबर फार दुखत होती. हे प्रसाद यांनी वैद्य संदेश यांना सांगितले. त्या वेळी त्यांनी प्रसाद यांना आधार देत सांगितले, ‘‘तुम्ही ताईंची अजिबात काळजी करू नका. त्यांची काळजी घेण्यास आम्ही दोघे आहोत.’’ त्यांनी लगेच माझ्यावर उपचार केले.’

– सौ. प्रार्थना देव

१ ए. स्वतःकडून होणार्‍या चुकांविषयी असलेली संवेदनशीलता !

१ ए १. उपचारांसाठी येण्यास उशीर झाल्यास क्षमा मागणे : ‘इतर रुग्णांवर उपचार चालू असतांना माझ्यावर उपचार करण्यास उशीर झाला, तर ते त्यासाठी माझी क्षमा मागायचे.

१ ए २. स्वतःची कुठलीही प्रतिमा न जपता स्वतःकडून झालेली चूक स्वतः घेत असलेल्या वैद्यांच्या अभ्यासवर्गात सांगणे : आम्ही तिथे रहात असतांना वैद्य संदेश यांचा त्यांच्याच चिकित्सालयात ‘गर्भसंस्कार’ या विषयावर अभ्यासवर्ग होता. त्या वर्गासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक विद्यार्थी अन् काही वैद्यही आले होते. त्या अभ्यासवर्गात त्यांनी स्वतःकडून झालेली चूक प्रामाणिकपणे आणि कुठलीही प्रतिमा न जपता सांगितली. ते म्हणाले, ‘‘पूर्वी एकदा माझ्याकडून चूक झाली होती. त्यातून मी शिकलो. त्यामुळे नंतर या चुका मला टाळता आल्या.’’ यावरून त्यांची स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ माझ्या लक्षात आली. व्यवहारात असलेल्या वैद्यांमध्ये इतका पारदर्शकपणा क्वचितच पहायला मिळतो.’

– श्री. प्रसाद देव

१ ऐ. भाव

१ ऐ १. देवाविषयी असलेला कृतज्ञताभाव : ‘एकदा वैद्य संदेश श्री. प्रसाद यांच्यावर उपचार करत असतांना प्रसाद यांना त्या वेळी आवश्यक असलेल्या उपचारांच्या पद्धती त्यांना सुचल्या. त्या वेळी त्यांनी हात जोडून ‘देवानेच सुचवले’ अशी कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळी त्यांच्या अंगावर आलेले रोमांच त्यांनी मला दाखवले.

१ ऐ २. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) आणि पू. (सौ.) संगीता जाधव भेटायला आल्या असतांना जाणवलेली सूत्रे

१ ऐ २ अ. सद्गुरु अनुताईंवर उपचार करण्यासाठी सेवाकेंद्रात जाण्याची सिद्धता दर्शवणे : ‘सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर (सद्गुरु अनुताई) यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्य संदेश यांना सेवाकेंद्रात उपचारांसाठी जावे लागल्यास ते जाऊ शकतील का ?’ असे त्यांना विचारल्यावर श्री. आणि सौ. चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता; मात्र सद्गुरु अनुताईच आम्हाला भेटायला चिकित्सालयात आल्या. त्या वेळी सद्गुरु अनुताईंशी बोलतांना वैद्य संदेश म्हणाले, ‘‘आम्हीच तुम्हाला भेटायला येणार होतो, तर तुम्हीच येथे आलात.’’ त्यावर सद्गुरु अनुताई म्हणाल्या, ‘‘तुम्ही आमच्या साधकाची एवढी छान सेवा केली. त्यामुळे देवानेच आम्हाला तुम्हा दोघांना भेटण्यासाठी येथे पाठवले.’’

१ ऐ २ आ. ‘प्रसाद यांच्यावर करायचे उपाय देवच सुचवत होता’, असे कृतज्ञताभावाने सांगणे : ‘श्री. प्रसाद यांच्यावर उपचार करतांना देवच मला सर्वकाही सुचवत आहे’, असे वैद्य संदेश यांनी सद्गुरु अनुताई यांना सांगितले. तसेच त्यांनी त्यांना आलेले काही अनुभवही सद्गुरु अनुताई यांना सांगितले. तेव्हा सद्गुरु अनुताई वैद्य संदेश यांना म्हणाल्या, ‘‘तुमच्या (वैद्यकीय) गुरूंनीच तुम्हाला सुक्ष्मातून योग्य उपचार सुचवून सर्व तुमच्याकडून करवून घेतले.’’

श्री. प्रसाद यांना चालतांना-फिरतांना बघून सद्गुरु अनुताई आणि पू. (सौ.) जाधवकाकू यांना पुष्कळ आनंद झाला.’

– सौ. प्रार्थना देव

१ ओ. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी असलेला भाव

१ ओ १. ‘परात्पर गुरु डॉक्टर हे उच्च कोटीचे संत आहेत’, असे कळल्यावर त्यांना ‘परम पूज्य’ असे म्हणणे : ‘वैद्य संदेश चव्हाण यांच्यासमोर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा विषय निघाल्यावर ते त्यांना ‘आठवले सर’ म्हणायचे, उदा. ‘पूर्वी आम्ही आठवले सरांचे ग्रंथ वाचले आहेत’, असे ते म्हणाले. त्यांनी १ – २ वेळा असे म्हटल्यावर आम्ही त्यांना ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे उच्च कोटीचे संत आहेत. आम्ही सर्व साधक त्यांना ‘परम पूज्य’, असे संबोधतो’, असे सांगितले आणि त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा थोडक्यात परिचय सांगितला. त्यानंतर वैद्य संदेश यांनी ‘क्षमा करा’, असे म्हणून ‘आता आम्हीही त्यांना ‘परम पूज्य’ असेच म्हणत जाऊ’, असे सांगितले.’

– श्री. प्रसाद आणि सौ. प्रार्थना देव

२. वैद्य संदेश चव्हाण यांनी संस्कृत भाषेचे सांगितलेले वैशिष्ट्य !

‘एक दिवस बोलता बोलता वैद्य संदेश चव्हाण मला म्हणाले, ‘‘दादा, तुम्हाला पाहून असे वाटते की, ‘तुम्ही शाळेतही कधी कोणाशी भांडले नसाल. तशी तुमची प्रकृती नाही अन् भांडले असाल, तर केवळ ‘मूर्ख पंडित’ ही संस्कृत भाषेतील शिवी दिली असेल.’’ संस्कृत भाषेचे महत्त्व सांगतांना ते आम्हाला म्हणाले, ‘‘संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे या भाषेत ‘मूर्ख पंडित’ ही सर्वांत अंतिम आणि मोठी शिवी आहे. या भाषेत याहून आणखी कोणती मोठी शिवी नाही. वास्तविक इतर भाषांत ‘मूर्ख’ ही सर्वांत सौम्य शिवी आहे अन् कदाचित् बरेच जण ती प्रतिदिन उच्चारतात; परंतु संस्कृत भाषा इतकी पवित्र आहे की, इतर भाषांमध्ये प्रतिदिन उच्चारली जाणारी शिवी संस्कृतमध्ये ‘सर्वांत वाईट शिवी’ म्हणून वापरली जाते. ‘यावरून ही भाषा किती सात्त्विक आहे’, हे लक्षात येते.’’

– श्री. प्रसाद देव

३. वैद्या गायत्री चव्हाण यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

३ अ. प्रेमभाव

३ अ १. स्वतः व्यस्त असतांनाही जेवणाचा डबा बनवून आणणे : ‘वैद्या (सौ.) गायत्री व्यस्त असतांनाही आमच्या दोघांसाठी प्रतिदिन अल्पाहार आणि जेवण स्वतः बनवून आणत. श्री. प्रसाद यांचे उपचार चालू असल्यामुळे त्यांच्या पथ्याचा विचार करून त्या स्वयंपाक करीत. रुग्णांच्या व्यस्ततेमुळे वैद्या गायत्री आणि वैद्य संदेश यांना घरी जेवायला जाण्यास शक्य होणार नसेल, त्या दिवशी त्या त्यांचाही जेवणाचा डबा आमच्या डब्याच्या समवेत चिकित्सालयात घेऊन येत.

३ अ २. विवाहाचा वाढदिवस कौतुकाने गोड पदार्थ करून आणि देवदर्शनाला नेऊन साजरा करणे : आम्ही तिथे असतांनाच आमच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस होता. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी वैद्या गायत्री यांनी मला त्यांच्या घरी नेऊन पुष्कळ प्रेमाने त्यांची साडी आणि दागिने परिधान करण्यास दिले. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘ताई, तुमच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस आपण वेगळ्या प्रकारे साजरा करूया.’’ त्या दिवशी त्यांनी आमच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त जेवणात गोड पदार्थ करून आणला आणि त्याच दिवशी त्या आम्हाला प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेल्या.

– सौ. प्रार्थना देव

३ अ ३. परतीच्या प्रवासासाठीही स्वतः पहाटे लवकर उठून डबा करून देणे : आम्ही परत येण्याच्या दिवशी आमची पहाटे ५.३० वाजताची आगगाडी होती. प्रवासासाठी आम्हाला जेवणाचा डबा देण्यासाठी वैद्या गायत्री स्वतः पहाटे ४ वाजता उठल्या. त्यांनी आम्हाला अल्पाहार आणि जेवणाचा डबा करून दिला. त्या वेळी मी त्यांच्या साहाय्याला गेले असतांना त्यांनी मला काहीही साहाय्य करू दिले नाही.

३ आ. इतरांचा विचार करणे : जेवणाचे डबे आणि भांडी घासतांना त्या मला म्हणायच्या, ‘‘ताई, तुम्ही ही कामे करण्यासाठी इथे आला नाहीत. तुम्ही केवळ प्रसाद यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि स्वतःही विश्रांती घ्या.’’

– सौ. प्रार्थना देव

४. वैद्य संदेश आणि वैद्या गायत्री चव्हाण यांच्याविषयी जाणवलेली काही सामायिक सूत्रे

४ अ. नम्रता : ‘वैद्य संदेश आणि वैद्या गायत्री त्यांच्याकडे येणार्‍या अन् त्यांच्याशी जवळीक असलेल्या वयस्कर रुग्णांना वेळप्रसंगी खाली वाकून नमस्कार करतात.

४ आ. शिकून त्वरित तशी कृती करणे

१. आमची त्यांच्या समवेत प्रतिदिन साधनेच्या एका विषयावर चर्चा होत असे. त्यात त्यांना जे काही सूत्र कळत होते, ते सूत्र ते लगेच आचरणात आणत, उदा. मीठ-पाण्याचे उपाय, अत्तर आणि कापूर यांचे उपाय, कुलदेवता अन् दत्त यांचा नामजप इत्यादी.

२. श्री. आणि सौ. चव्हाण यांना रुग्ण तपासतांना रुग्णातील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा यांचा आपल्यावर होत असलेला परिणाम लक्षात येतो आणि त्यानंतर त्यांना ‘स्वतःच्या शरिराचा रंग काळवंडतो’, याची जाणीव होते. याविषयी त्यांच्याशी बोलतांना आम्ही त्यांना उपायांचे महत्त्व सांगितले आणि त्या विषयाच्या संकेतस्थळावरील ‘लिंक’ त्यांना भ्रमणभाषवर पाठवली. श्री. आणि सौ. चव्हाण यांना उपायांचे महत्त्व लक्षात आल्यापासून रुग्णांवर उपचार चालू करण्यापूर्वी ते अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतात अन् दोन्ही तळहातांना गोमूत्र लावूनच रुग्णाला तपासतात. त्याचप्रमाणे ते भ्रमणभाषवर हळू आवाजात नामजप लावून ठेवू लागले आहेत.

४ इ. समष्टी विचार

१. स्वतःमध्ये असे पालट केल्यावर त्यांना येत असलेल्या थकव्याचे प्रमाण अल्प झाले असल्याचे त्यांना जाणवले. या उपायांमुळे जाणवलेला पालट त्यांनी लगेचच त्यांच्या वैद्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटातील सर्वांना लिहून पाठवला.’

२. आम्ही आश्रमात परत आल्यावरही त्यांनी श्री. प्रसाद यांच्या प्रकृतीची वेळोवेळी चौकशी केली.


जीवनातील प्रत्येक कृती आयुर्वेदानुसार करणारे वैद्य संदेश अन् वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण !

१. जेवणापूर्वी दोघेही हात जोडून आयुर्वेदातील मंत्र (श्‍लोक) म्हणून जेवायला आरंभ करतात. ‘त्यांच्या बर्‍याच कृतीतून ते दोघेही आयुर्वेद जगतात’, असे जाणवते.

२. एका रुग्णाला तपासतांना ते म्हणाले, ‘‘आम्ही रुग्णाला आवश्यक असतील, तेवढेच उपचार करतो. केवळ स्नेहन, स्वेदन अन् मर्दन केल्याने आम्ही पुष्कळ पैसे मिळवू शकतो; पण आयुर्वेदात ‘जसे राजा प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो, तसे वैद्यांनी रुग्णाला पुत्राप्रमाणे समजून योग्य उपचार करावेत’, असे सांगितले आहे.’’ ते दोघेही आम्हाला पुत्रवत सांभाळत असल्याचे आम्हीही अनुभवले.

३. आयुर्वेदीय औषधे बनवतांना ते विष्णु सहस्रनाम किंवा श्री विष्णूचा नामजप भ्रमणभाषसंचावर लावून मगच औषधे सिद्ध करायला आरंभ करतात. यामागे ‘औषधे सात्त्विक अन् शक्तीशाली व्हावीत आणि रुग्णाने ती ग्रहण केल्यावर त्यांना औषधांचा गुण यावा’, असा त्यांचा उद्देश असतो.’

– सौ. प्रार्थना देव


५. कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच वैद्य संदेश अन् वैद्या (सौ.) गायत्री चव्हाण यांच्यासारख्या चांगल्या आणि सात्त्विक वैद्यांकडे उपचार घेण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यामुळे मी (प्रसाद) इतक्या अल्प कालावधीत पुष्कळ बरा झालो. आता मी प्रतिदिन ३ ते ४ घंटे सेवा करू शकतो. परात्पर गुरु डॉक्टरांच्याच कृपेने सनातनला चांगले आयुर्वेदीय वैद्य असलेले आणखी एक चांगले कुटुंब जोडले गेले. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. प्रसाद आणि सौ. प्रार्थना देव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२०)

वैद्य संदेश चव्हाण यांचे वडील श्री. चैतराम चव्हाण यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

१. डोळ्याने दिसत नसूनही स्वावलंबी असणे

‘श्री. चैतराम चव्हाण यांना दिसत नसतांनाही ते बर्‍याचदा स्वतःची कामे स्वतः करतात, उदा. अधिकोषात जाणे, पटांगणात फिरायला जाणे, देवळात जाणे, चिकित्सालयात जाणे इत्यादी.

२. श्री. चैतराम चव्हाण यांना आलेली अनुभूती !

२ अ. देवळात गेल्यावर श्री. चैतराम नेहमी इतरांचे चप्पल जिथे नसतात, तिथे चप्पल काढत असणे; मात्र एकदा त्यांच्या नेहमीच्या जागेवर अनेक भाविकांनी त्यांची पादत्राणे काढल्यामुळे श्री. चैतराम यांना चप्पल न मिळणे : देवळात जाऊन दर्शन घेऊन आल्यावर ‘स्वतःची पादत्राणे सापडावी’ या हेतूने ते जिथे इतरांची पादत्राणे नसतील, त्या ठिकाणी त्यांची पादत्राणे काढतात. एकदा ते देवळात गेले असतांना त्यांनी नेहमी ते ज्या ठिकाणी पादत्राणे काढत होते, त्या ठिकाणी पादत्राणे ठेवली. देवळात जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर नेहमीच्या ठिकाणी ते त्यांची पादत्राणे चाचपडत असतांना त्या ठिकाणी अनेक भाविकांनी त्यांची पादत्राणे काढली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना ‘आता स्वतःची पादत्राणे कशी ओळखावी ?’ असा प्रश्‍न पडला. थोडा वेळ ते पादत्राणे चाचपडून पहात होते; पण त्यांना त्यांची पादत्राणे मिळत नव्हती.

२ अ १. देवाला प्रार्थना केल्यावर एका आजींच्या माध्यमातून देवाने साहाय्य करणे : त्यांनी देवाला मनोमन प्रार्थना केली, ‘हे देवा, माझी पादत्राणे आता मी कशी ओळखू ? पादत्राणे न घेता गेलो, तर मला मार्गात ठेच लागण्याची भीती आहे. आता मी काय करू ?’ त्यांनी ही प्रार्थना केल्याक्षणी बाजूच्या कठड्यावर बसलेल्या एका आजीने त्यांना विचारले, ‘‘काय झाले बाबा ?’’ तेव्हा बाबांनी त्यांची चप्पल सापडत नसल्याचे सांगून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्या वेळी त्या आजीने त्यांना एका बाजूला निर्देश करून सांगितले, ‘‘तिकडे बघा, तिकडे सापडेल.’’ त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी चाचपडून पाहिल्यानंतर त्यांना त्यांची चप्पल लगेच सापडली. त्या वेळी ‘देवानेच त्या वृद्ध महिलेला माझ्या साहाय्याला पाठवले’, असे वाटून त्यांचा भाव जागृत झाला. ही अनुभूती आम्हाला सांगतांना ते म्हणाले, ‘‘असे अनेक ठिकाणी देव मला साहाय्य करतो. त्याचे आभार मानावे, तेवढे अल्पच आहेत.’’

३. नाम आणि सत्संग यांचे महत्त्व कळल्यावर लगेच त्याप्रमाणे कृती करणे

३ अ. साधना समजल्यावर विनाविलंब कुलदेवता आणि दत्त यांचे नामजप करायला आरंभ करणे :

श्री. चैतराम चव्हाण अनेक देवतांचे नामस्मरण करत होते. एके दिवशी त्यांनी याविषयी मला सांगितले. तेव्हा मी त्यांना प.पू. गुरुदेवांच्या साधना आणि शंकानिरसन या ध्वनीफिती ऐकवल्या. त्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामाचे महत्त्व सांगितले आहे. ही ध्वनीफित ऐकून त्यांनी त्या वेळेपासूनच कुलदेवता आणि दत्त यांचे नामजप करायला आरंभ केला. आता प्रतिदिन ते ९ माळा दत्ताचा अन् दिवसभर अधिकाधिक वेळ कुलदेवतेचा नामजप करू लागले आहेत. ते त्यांच्या परिचयातील इतरांनाही हे नामजप करायला सांगत आहेत. याविषयी ते मला म्हणाले, ‘‘श्री गुरूंनी सांगितले आहे, तर ते लगेच आचरणात आणायला हवे.’’ त्या दिवसापासून ते आम्हाला प्रतिदिन साधना आणि शंकानिरसन यांचे पुढील भाग ऐकवायला सांगत होते.

३ आ. सत्संगाचे स्थळ कळल्यावर त्वरित त्या सत्संगाला जाण्यास आरंभ करणे : एक दिवस कुर्ला येथील साधक श्री. महाजनकाका वैद्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने देण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांचे बाबा, म्हणजे श्री. चैतराम चव्हाण तिथे उपस्थित होते. त्यांच्याशी बोलतांना महाजनकाकांनी सांगितले, ‘‘कुर्ला येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठात प्रत्येक मंगळवारी सत्संग चालतो.’’ हे ऐकून बाबांना पुष्कळ आनंद झाला. ते लगेच येणार्‍या मंगळवारपासून सत्संगात जाऊ लागले. अजूनही ते प्रत्येक मंगळवारी सत्संगाला जातात.

४. इतरांना आधार देणे

वैद्य संदेश यांच्याप्रमाणे त्यांच्या वडिलांनीही मला ‘दुखण्यामुळे खचून जाऊ नये आणि सकारात्मक रहावे’, यासाठी स्वामी समर्थांचे ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी…’ हे भजन अनेक वेळा ऐकायला सांगितले.

५. प्रेमभाव

आम्ही माझे उपचार पूर्ण झाल्यावर गोव्याला परत येण्यासाठी आगगाडीत बसलो असतांना मला श्री. चैतराम चव्हाण बाबांचा भ्रमणभाष आला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्हाला प्रवासात त्रास होऊ नये; म्हणून मी सकाळी १२० माळा नामजप केला.’’

– श्री. प्रसाद देव, सनातन आश्रम, गोवा. (३.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक