केंद्र सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून शेवटचे उपोषण

मुंबई – जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे शेवटचे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीच्या संदर्भात भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनांच्या भाषणांचे व्हिडिओ ते देशभर प्रसारित करणार आहेत. ‘त्या वेळी संसदेतील भाषणे केवळ सत्ता मिळवण्यासाठी होती का?’, असा सडेतोड प्रश्‍न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. अण्णा हजारे यांनी १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपण शेवटच्या आंदोलनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळवले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये उपोषणे केली होती. त्या वेळी ‘केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांविषयी संवेदनशील आहे.

शेतकरी हिताच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक आहे. मागण्यांच्या संदर्भात कालबद्ध कार्यक्रमानुसार निर्णय घेण्यात येतील’, असे लेखी आश्‍वासन पंतप्रधान कार्यालयाने दिले होते; मात्र पुढे काहीही झाले नाही. ‘शेतकरी हिताच्या मागण्यांच्या संदर्भात विचार करण्यासाठी कृषीतज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, भाज्या, फळे, दूध, फुलांची किमान आधारभूत किंमत निश्‍चित करण्यात येईल, नाशवंत पिकांच्या साठवणुकीसाठी ६ सहस्र कोटी रुपयांची वातानुकूलित गोदामांची उभारणी करण्यात येईल’, अशी आश्‍वासने देण्यात आली होती; मात्र तीन वर्षे उलटून गेली, तरी त्यांची पूर्तता झालेली नाही. आजही शेतकर्‍यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते, असे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

वर्षे २०११ मध्ये देहलीतील रामलीला मैदानात झालेल्या आंदोलनाच्या वेळी भाजपचे अनेक नेते संसदेत माझ्या समर्थनार्थ भाषणे ठोकत होते. माझ्या मागण्या कशा योग्य आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. माझे कौतूक करतांना त्यांना शब्द अपुरे पडत होते. मग आता काय झाले? आश्‍वासने पूर्ण करणे तर सोडाच, माझ्या पत्रांनाही केंद्र सरकार, पंतप्रधान कार्यालय यांच्याकडून उत्तरे दिली जात नाहीत, अशी खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.