सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी ७० टक्के मतदान : मतदान शांततेत !

जिल्ह्यातील १ सहस्र ८७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

प्रातिनिधिक छायाचित्र

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेले मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर १ सहस्र ८७ गावकारभार्‍यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ जानेवारीला होणार्‍या मतमोजणीकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे. (आजच्या आधुनिक युगात मतमोजणीला ३ दिवस का लागतात ? दुसर्‍याच दिवशी मतमोजणी का करू शकत नाही ? हे चित्र प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)

सर्व मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणार्‍या मतदारांना सॅनिटायझर देण्यात येत होते. ‘थर्मल गन’ने मतदारांच्या शरिराचे तापमान मोजण्यात येत होते. मतदान केंद्रांच्या बाहेर उमेदवारांसह संबंधित राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील कोलगाव, तळवडे, मळगाव, चौकुळ, आंबोली यांसारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागांतील मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात गर्दीचे चित्र होते, तर आरोस दांडेली, डिंगणे, आरोंदा यांसारख्या छोट्या लोकसंख्येच्या गावांतील मतदान केंद्रांवर अल्प मतदार दिसून येत होते.

दांडेलीत मतदान यंत्रात बिघाड

दांडेली येथे मतदानास आरंभ झाल्यानंतर अवघ्या काही वेळात प्रभाग क्रमांक २ मधील मतदान यंत्राचे एक बटण दाबले जात नव्हते. याविषयीची माहिती तेथील केंद्राध्यक्षांना देण्यात आली. काही वेळानंतर ही तांत्रिक समस्या दूर करण्यात आली. या वेळी येथील पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी तालुक्यातील सर्व अकराही गावांतील मतदानकेंद्रांना भेट दिली.