एकाच व्यक्तीने दोनदा विवाहनोंदणी केल्याप्रकरणी चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी

विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी लाच घेतल्याचा आरोप

पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – एका व्यक्तीने २ वर्षात २ वेगवेगळ्या महिलांशी विवाह करून विवाहनोंदणी केल्याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसने केली आहे. या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रतिमा कुतिन्हो

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, ‘‘एका व्यक्तीने वर्ष २०१७ मध्ये एका महिलेशी विवाह केला आणि नंतर वर्ष २०१८ मध्ये दुसर्‍या महिलेशी विवाह केला आहे. या व्यक्तीने लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे. या दोन्ही विवाहांची प्रमाणपत्रे एकाच कार्यालयातून देण्यात आली आहेत. कागदपत्रे योग्य पडताळून न पहाता ही प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, असे वाटते. यासंबंधी आम्ही विवाहनोंदणी कार्यालयातील अधिकारी डोमिंगोज मार्टीन यांना कार्यालयात काहीतरी चुकीचे घडत असल्याविषयी जाणीव करून दिली आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी कुणीतरी लाच घेतली आहे. यासंबंधी सविस्तर चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. कायदा आणि न्याय खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी अशा प्रकारच्या गैरव्यवहारात लक्ष घालावे.’’