साधकांच्या नाडीपट्टीतील मृत्यूसारखे भविष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे पालटणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ऑक्टोबर २०१३ मध्ये मी पुणे येथील अगस्ती नाडीपट्टीवाचक श्री. मुदलियारगुरुजी यांच्याकडे माझी नाडीपट्टी पहाण्यासाठी प्रथमच गेले होते. तेव्हा माझ्यासह साधक श्री. धनंजय कर्वे हेही होते. त्या वेळी श्री. कर्वे यांनी आधी माहिती दिल्यानुसार श्री. मंदार गाडगीळ (सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे धाकटे बंधू) यांची नाडीपट्टी शोधून ठेवली होती आणि तिचेही वाचन श्री. मुदलियारगुरुजी यांनी आमच्या समोर केले.

​‘हीच नाडीपट्टी श्री. मंदार यांची आहे का ?’, याची निश्‍चिती करण्यासाठी त्यांनी श्री. मंदार यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग सांगून ‘हे खरंच घडले आहेत का’, असे आम्हाला विचारले. आम्हाला त्याविषयी माहिती नसल्याने मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून त्याविषयी विचारून घेतले आणि ती माहिती श्री. मुदलियारगुरुजी यांना दिली.

त्यानंतर जे नाडीवाचन झाले, त्यात गुरुजींनी सांगितले, ‘‘श्री. मंदार यांच्या आई-वडिलांपैकी एकाचा २ वर्षांनी मृत्यूयोग आहे. २ वर्षांनी, म्हणजे वर्ष २०१५ मध्ये या दोघांपैकी एकच जण जिवंत असेल.’’ हे भविष्य अगस्ती नाडीपट्टीत दिलेले होते.

​आता वर्ष २०२० चालू आहे आणि श्री. मंदार अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे आई-वडील दोघेही जिवंत असून ते सनातनच्या आश्रमात साधनारत आहेत.

वरील प्रसंगावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे नाडीपट्टीतील मृत्यूसारखे भविष्यही पालटू शकते’, हे माझ्या लक्षात आले अन् माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे किती साधकांच्या संदर्भातही असे झाले असेल’, त्याची गणतीच करता येणार नाही. अनेक साधकांना ते मृत्यूच्या दाढेतून वाचल्याच्या अनुभूतीही आल्या आहेत.

​परात्पर गुरु डॉक्टरांची महानता, त्यांचे अलौकिकत्व हे सारे शब्दांत मांडणे अशक्यच आहे. आम्हा सर्व साधकांना साक्षात् श्री महाविष्णुस्वरूप असलेले परात्पर गुरु डॉक्टर गुरु म्हणून लाभले आहेत. मी त्यांच्या दिव्य चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. राजश्री खोल्लम, पुणे (१४.९.२०२०)

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

वर्ष २०१० मध्ये माझ्याही नाडीपट्टीचे वाचन श्री. मुदलियारगुरुजींनी केले होते. त्यामध्येही ‘वर्ष २०१६ नंतर तुमच्या आई-वडिलांपैकी एकच जण जिवंत असेल’, असे होते. त्याप्रमाणे सप्टेंबर २०१६ मध्ये देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या माझ्या आईची (सौ. माधुरी माधव गाडगीळ हिची) प्रकृती पुष्कळ बिघडली होती. ‘आता ती जगणार नाही’, असेच सर्व कुटुंबियांना वाटत होते. तेव्हा प.पू. पांडे महाराज यांनी तिच्यासाठी प्रतिदिन १ – २ घंटे नामजपादी उपाय करून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेही तिला पुनर्जन्म मिळाला. तिच्या स्वतःच्या भविष्यातही (नाडीपट्टीतही) तिच्या मृत्यूला ‘गुरुचांडाळ योग कारण आहे’, असे होते आणि ‘यातून वाचवणे केवळ गुरूंनाच शक्य आहे. गुरुकृपा असेल, तर यातून वाचू शकतो’, असे म्हटले होते. त्याचीच प्रचीती त्या वेळी आली. सप्टेंबर २०१६ मधील पितृपंधरवडा संपल्यानंतर चालू झालेल्या नवरात्रामध्ये आईची प्रकृती पुष्कळशी बरी झाली. तिच्यावरील मृत्यूचे संकट दूर झाले. आता (ऑक्टोबर २०२०) गेल्या दीड वर्षापासून माझे आई-वडील गोव्यातील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. केवढी ही गुरुकृपा आणि गुरूंचे सामर्थ्य !

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, १६.१०.२०२०

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक