नवजातांचे मारेकरी कोण ?

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील ‘शिशु केअर युनिट’मध्ये लागलेल्या भीषण आगीत १० बाळांचा मृत्यू झाला. आगीत झालेल्या या हानीमुळे देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वांनाच धक्का बसला आहे. नवजात आणि लहान बालकांविषयी याच स्वरूपाची दुर्घटना उत्तरप्रदेशमध्ये काही वर्षांपूर्वी घडली होती. तिथे ऑक्सिजनअभावी आणि योग्य उपचार न मिळाल्याने ७४ लहान बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशात हलकल्लोळ उडाला होता. भंडार्‍यातील बालकांच्या मातांना त्यांची बाळे अशा स्थितीत मिळतील, याची कल्पनाही नव्हती.

मध्यरात्री आग लागल्यावर तिच्या धुरामुळे तेथील परिचारिकेला आग लागल्याची कल्पना आली आणि नंतर तिने वरिष्ठ अधिकारी, आधुनिक वैद्य यांना या घटनेविषयी माहिती दिली. तेव्हा या बालकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले; मात्र तोपर्यंत अनेक बालके मृत्यूमुखी पडली होती. मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त रुग्णालयात ‘फायर अलार्म’ आणि पाणी यांची सुविधा नव्हती. धुरामुळे अग्नीरोधक घंटी वाजल्यावर त्वरित लक्षात येऊन पाण्याच्या ‘पाईपलाईन’ने आग विझवता येऊ शकली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रसाधनगृहातून पाण्याच्या बादल्या भरून त्या नवजात बालकांच्या विभागात आणून आग विझवण्यास पुष्कळ वेळ गेला. या आगीच्या दुर्घटनेनंतर सरकारने त्वरित रुग्णालयांचे अग्नीपरीक्षण करण्यास सांगितले. आता नेहमीप्रमाणे रुग्णालयांचे आगीच्या दृष्टीने परीक्षण होईल, त्याचा अहवाल येईल आणि पुन्हा सर्व शांत होईल.

आगीच्या घटना वारंवार का घडतात ?

मुंबईतील अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला वर्ष २०१८ मध्ये लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सर्वच ‘नर्सिंग होम’ आणि रुग्णालये येथील अग्नीसुरक्षाविषयक ‘ऑडीट’, तपासणी आणि यंत्रणा चालू नसल्यास कारवाई करण्याची मोहीम चालू केली होती; मात्र काही दिवसांनी त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मुंबईत १ सहस्र ३०० हून अधिक रुग्णालये आहेत; मात्र झोपडपट्टी अधिक असलेल्या भागातील ६० रुग्णालयांपैकी ३६ रुग्णालयांमध्ये अग्नीसुरक्षा यंत्रणाच नाही. अग्नीप्रतिबंधक यंत्रणा पूर्णपणे चालू स्थितीत असलेल्या रुग्णालयांची संख्या अल्प आहे. काही रुग्णालयांमध्ये ‘फायर एक्स्टींग्युशर’ आहेत, त्यांची मुदत संपलेली आहे. दुरुस्तीची कामे चालू असलेल्या रुग्णालयांमध्ये विद्युत्वाहक तारा लोंबकळत असलेल्या स्थितीत दिसतात. अग्नीशमन यंत्रणा असणे आणि त्यातही ती चालू स्थितीत असणे असे आग लागलेल्या ठिकाणी अभावानेच आढळते. सर्वांची भिस्त ही अग्नीशमन दलाच्या बंबावर असते, असे लक्षात येते. रुग्णालये, रासायनिक प्रक्रिया करणारी आस्थापने, विद्युत् निर्मिती आणि तिचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करणारी आस्थापने, गर्दीची ठिकाणे यांसारख्या ठिकाणी आग लागल्यास मनुष्यहानी होण्याची शक्यता अधिक असते; मात्र तेवढी काळजी घेतली जाते का ? हा प्रश्‍नच असतो. बहुतेकांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणेला जाग का येते ? मानवी सुरक्षेशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष का होते ? अतीदक्षता विभागांमध्ये परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांचा वावर असतो. या ठिकाणी ते होते का, हे पहावे लागेल. अन्यथा मोठी आग लागून त्यांना ते लक्षात येत नाही, हे कसे शक्य आहे ? याचा अर्थ येथे गलथानपणा झाला आहे, याची निश्‍चिती पटते. मध्यंतरी मुंबईतील मोठी रुग्णालये, इमारत येथे आग लागल्यावर सक्षम व्यवस्था उभारण्याची चर्चा झाली. उंच इमारतींपर्यंत उपलब्ध यंत्रणा पोचू शकत नसल्याने उंच शिड्या असणार्‍या गाड्या मागवण्यात आल्या. त्यांचा वापर मागील ३ – ४ वर्षांत चालू झाला. भंडारा येथील दुर्घटनेचे पडसाद शेजारील देश पाकिस्तानमध्येही उमटले. झालेली दुर्घटना नवजात बालकांविषयी असल्यामुळे विशेष नोंद घेण्यात आली. जगात लागलेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये बहुतांश जंगलातील आग या प्रकारांत मोडतात. याचा अर्थ मनुष्यवस्तीत आग लागण्याच्या घटना घडत नाहीत, असा नाही; मात्र त्यांचे प्रमाण आपल्याकडे लागणार्‍या आगींच्या तुलनेत नगण्य म्हणावे लागेल. त्यामुळे यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ सिद्ध ठेवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आग लागल्यावर ‘फायर एक्स्टींग्युशर’ कसे वापरावे, हेसुद्धा अनेकांना ठाऊक नसते. या व्यवस्थेतील त्रुटी, उणिवा दूर केल्याविना आपत्कालीन परिस्थितीत निष्पापांचे प्राण वाचवणे शक्य होणार नाही, हे येथे नमूद करावेसे वाटते.