साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू आणि मार्गशीर्ष मास चालू आहे. १४.१.२०२१ पासून पौष मास चालू होणार आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो.
टीप २ – प्रदोष, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), यमघंट योग आणि संकष्ट चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |
२. शास्त्रार्थ
२ अ. प्रदोष व्रत : त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करतात. रविवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘रविप्रदोष’ किंवा ‘भानुप्रदोष’ म्हणतात. भानुप्रदोष व्रत केल्याने उत्तम आरोग्य आणि दीर्घायु प्राप्त होते. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे.
२ आ. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १०.१.२०२१ या दिवशी रविवार असून सायंकाळी ४.५३ पर्यंत द्वादशी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ११.१.२०२१ या दिवशी दुपारी २.३३ पासून उत्तररात्री १.२६ पर्यंत आणि १६.१.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.५२ पासून १७.१.२०२१ या दिवशी सकाळी ८.०९ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. दर्श-वेळा अमावास्या : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. मार्गशीर्ष मासातील अमावास्येला दर्श-वेळा अमावास्या म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतातील धान्यलक्ष्मीचे पूजन करतात. खेडोपाडी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बुधवार, १२.१.२०२१ या दिवशी दुपारी १२.२३ पासून १३.१.२०२१ या दिवशी सकाळी १०.३० वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.
२ उ. धनुर्मास समाप्ती : सूर्य ग्रहाचा धनु राशीत प्रवेश झाल्यावर दुसर्या दिवशी धनुर्मासाचा प्रारंभ होतो. भोगीच्या दिवशी म्हणजे मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी धनुर्मास समाप्ती असते.
२ ऊ. भोगी : मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा उत्सव साजरा करतात. या दिवशी तीळमिश्रित भाकरीसह उष्णतावर्धक भाज्या खातात.
२ ए. मकरसंक्रांत : सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर पुण्यकाळाच्या दिवशी मकरसंक्रांत हा सण साजरा करतात. १४.१.२०२१ या दिवशी पुण्यकाल सकाळी ८.१४ पासून सायंकाळी ४.१४ वाजेपर्यंत आहे. महाराष्ट्रात ‘मकरसंक्रांत’, तमिळनाडूमध्ये ‘पोंगल’ आणि पंजाबमध्ये ‘लोहरी’ या नावाने हा सण प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात येणार्या या सणाला तीळासारख्या स्निग्ध पदार्थासमवेत उष्णता निर्माण करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केलेले तीर्थस्नान आणि दान पुण्यकारक मानले आहे.
२ ऐ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. १४.१.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.३७ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
२ ओ. करिदिन : मकरसंक्रांतीच्या दुसर्या दिवशी ‘किंक्रांत’ म्हणजेच ‘करिदिन’ असतो. ‘या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये’, असा प्रघात आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३.१.२०२१)