सरकारी यंत्रणेचा अनागोंदी आणि वेळकाढू कारभार !
अकोला – सरकारने खरेदी केलेल्या १० सहस्र ८४७ क्विंटल ज्वारीचा येथील खदान भागातील सरकारी गोदामात सडून भुसा झाला आहे. यामुळे आता ती केवळ २२ रुपये क्विंटलने विकण्याची नामुष्की पुरवठा विभागावर ओढावली आहे.
(एकीकडे द्रारिद्य्ररेषेखालील जनतेला धान्य मिळत नाही; म्हणून ते अर्धपोटी असतात, तर दुसरीकडे सरकारी कर्मचार्यांच्या अशा हलगर्जीपणामुळे धान्याची नासाडी होते. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून धान्याची हानीभरपाई वसूल केली पाहिजे. – संपादक)
१. ४ वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत १४ सहस्र ९०४ क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली होती. प्रति क्विंटल १ सहस्र ५७० रुपये दराने ज्वारी खरेदी केली.
२. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा येथील सरकारी गोदामांमध्ये ही ज्वारी साठवून ठेवण्यात आली; मात्र गेल्या ४ वर्षांत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिका धारकांना ही ज्वारी दिली नाही. ३. भारतीय अन्न महामंडळ अर्थात ‘एफ्.सी.आय.’ने यासाठी अनुमती दिली नसल्याचा आरोप अकोला पुरवठा विभागाने केला आहे.