आणे (जिल्हा सातारा) येथील थकबाकीदारांची नावे फलकावर 

सातारा – कराड तालुक्यातील आणे ग्रामपंचायतीच्या वतीने थकबाकीदारांची नावे फलकावर (‘फ्लेक्स बोर्ड’वर) प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये गावातील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य आणि इतर समित्यांमधील आजी-माजी सदस्य यांच्या नावांचा समावेश आहे.

ग्रामपंचायत ग्रामस्थांना अनेक सोयीसुविधा पुरवत असते. नागरिकांनी वेळेवर कर भरला नाही, तर ग्रामपंचायतीला सोयीसुविधा पुरवण्यास अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेऊन जे कर भरणार नाहीत, अशांची नावे फलकावर लावण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार थकबाकीदारांची नावे नुकतीच फलकावर प्रसिद्ध करण्यात आली. या फलकावर ३८ थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध झाली असून त्यांच्याकडून १ लाख ६३ सहस्र १८८ रुपये कर येणेबाकी आहे. या फलकावर गावातील प्रतिष्ठितांची नावे प्रसिद्ध झाल्यामुळे हा फलक गावात चर्चेचा विषय बनला आहे.