शिर्डीतील साई संस्थानच्या वस्त्र संहितेविषयीच्या फलकाला काळे फासले !

  • भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचे कुकृत्य !

  • २ महिलांसह तिघेजण कह्यात

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणता पोशाख परिधान करावा, याविषयी धर्मशास्त्रात नियम आहेत. त्याचे हिंदू पालन करू इच्छितात; मात्र त्याला विरोध करून भूमाता ब्रिगेड स्वतःचे घोडे पुढे दामटू पहात आहे. यातून या संघटनेच्या कार्यकर्त्यांची उद्दाम वृत्ती दिसून येते !

शिर्डी – साई संस्थानने भाविकांना लागू केलेल्या ‘वस्त्र संहिते’ला (ड्रेसकोडला) भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यापूर्वीच विरोध करत ड्रेसकोडविषयीचे फलक हटवण्याची मागणी केली होती. ‘साई दर्शनासाठी भाविकांनी सभ्य पोशाखात यावे’, असे लिखाण असलेल्या साई संस्थानच्या विनंती फलकाला ७ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. या प्रकरणी २ महिलांसह तिघांना कह्यात घेण्यात आले आहे. तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संस्थान सुरक्षारक्षकांनी फलक स्वच्छ केला. या प्रकरणी ‘भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊ शकतो’, असे म्हटले जात आहे.

‘लवकरात लवकर हे फलक काढावेत, अन्यथा भक्तांना आध्यात्मिक शिक्षा देण्याचा प्रश्‍न असो किंवा ड्रेसकोडचा प्रश्‍न असो, यावर भूमाता ब्रिगेड आता आणखी आक्रमक होणार आहे’, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. (अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात किंवा धार्मिक प्रथा-परंपरांच्या संदर्भात असे बोलण्याचे तृप्ती देसाई यांचे धाडस तरी होईल का ? – संपादक)