इंग्लंड येथून परतलेल्या आणि ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आंदोलनाचा पवित्रा

मडगाव, ६ जानेवारी (वार्ता.) – इंग्लंड येथून परतलेल्या आणि मडगाव येथील ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे रुग्ण नवीन कोरोना विषाणूसंबंधीच्या पुणे येथील प्रयोगशाळेच्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. रुग्णालयातील अशा स्वरूपाच्या २९ रुग्णांनी त्यांना घरी अलगीकरणाची सुविधा उपलब्ध करावी अन्यथा रुग्णालयातून बाहेर जाणार असल्याची चेतावणी दिली आहे.

या आंदोलनानंतर शासनाने रुग्णालयात राहून १५ दिवस कालावधी झालेल्या रुग्णांची पुन्हा कोरोनासंबंधी चाचणी घेण्याचा आणि ज्यांच्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला असेल, त्यांना घरी अलगीकरणाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ९ डिसेंबरपासून इंग्लंड येथून ९७९ लोक आले आहेत आणि यामधील ६३ जणांना ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात अलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे.