चिपी विमानतळाला भंगसाळ नदीचे पाणी देण्यास कुडाळ शहर सुधार समितीचा विरोध

भविष्यात कुडाळ शहराला पाणीटंचाई भासण्याची व्यक्त केली भीती 

कुडाळ शहर सुधार समिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला निवेदन देताना

कुडाळ – शहरातून वाहणार्‍या भंगसाळ नदीचे पाणी चिपी विमानतळासाठी देण्यास कुडाळ शहर सुधार समितीने विरोध दर्शवला आहे. भविष्यात कुडाळ शहर, तसेच येथील एम्.आय.डी.सी.मध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळास पाणीपुरवठा करू नये, असे निवेदन सुधार समितीचे सदस्य आणि शहरातील नागरिक यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या येथील कार्यालयात दिले.

भंगसाळ नदीचे पाणी चिपी विमानतळासाठी दिल्यास भविष्यात शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी नागरिकांना केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ एम्.आय.डी.सी.तील उद्योगांना लागणारे पाणी आणि कुडाळ शहराला लागणारे पाणी  भंगसाळ नदीतूनच पुरवले जाते. मार्च, एप्रिल, मे या मासांत भंगसाळ नदीच्या पाण्याचा साठा अल्प होतो.