विसरवाडी (जिल्हा नंदुरबार) येथे ७ गायींना ट्रकची धडक

२ गर्भवती गायींचा मृत्यू

प्रतिकात्मक चित्र

नंदुरबार – नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ४ जानेवारी या दिवशी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बसलेल्या ७ गायींना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात २ गर्भवती गायींचा मृत्यू झाला असून ५ गायी घायाळ झाल्या आहेत. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहनाची चाके २ गायींच्या पायावरून गेल्याने त्या घायाळ झाल्या, तर वाहनाच्या समोरील भाग धडकल्याने ३ गायींच्या मानेचा भाग चिरला गेला आहे.

पोलीस कर्मचारी आणि तरुण यांच्याकडून साहाय्य महामार्गावर घायाळ अवस्थेत जनावरे पडलेली दिसताच परिसरातील तरुणांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या तरुणांच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेल्या गायींना रस्त्याच्या बाजूला केले. घायाळ गायींना विसरवाडी पशुवैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. वैद्यकीय कर्मचारी राठोड यांनी घायाळ गायींवर औषधोपचार केले.