पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळा सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात  

पनवेल – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वारूढ पुतळ्याजवळील सुशोभिकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असून एकूण २२ शिल्पे उभारण्यात आली आहेत.

पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांनी केली होती आणि त्याविषयी सतत पाठपुरावा केला. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत असल्याने शिवप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.