कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

प्रतिकात्मक चित्र

सध्या कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी आधारकार्ड क्रमांक किंवा भ्रमणभाषवर ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) पाठवून तो मागितला जात आहे. याद्वारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वीही तात्कालिक सामाजिक समस्या, नागरिकांची अगतिकता आणि भोळेपणा आदी कारणांनी समाजातील दुष्प्रवृत्ती लुबाडणूक करत असल्याचे आढळले आहे. अशाच प्रकारे पुढील काही कारणांसाठी आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ‘ओटीपी’ मागून किंवा पाठवलेली लिंक ‘क्लिक’ करण्यास सांगून नागरिकांची फसवणूक यापूर्वीही करण्यात आली होती अन् अजूनही होत आहे.

१. ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक लागले आहे.

२. ‘ऑनलाईन’ लॉटरी लागली आहे.

३. पती-पत्नी किंवा कुटुंबीय यांच्या पर्यटन दौर्‍यासाठी (‘ट्रॅव्हल पॅकेज’साठी) निवड झाली आहे.

४. परदेशवारीसाठी विमानाची तिकिटे मिळाली आहेत.

५. एखाद्या आस्थापनाचे (कंपनीचे) भाग्यवान ग्राहक (लकी कस्टमर) म्हणून निवड झाली आहे.

६. अबकारी खात्यातून (‘फॉरेन एक्सचेंज’मधून) किमती वस्तूंची सोडवणूक करायची आहे.

७. चारचाकी, शीतकपाट (फ्रीज), एल्ईडी टीव्ही यांसारख्या किमती वस्तू आदींचे पारितोषिक लागले आहे.

८. भ्रमणभाषचे ‘सीमकार्ड’ विनामूल्य अन्य आस्थापनामध्ये (कंपनीमध्ये) हस्तांतरित (पोर्ट) करून देतो.

९. अल्प व्याजदरात कर्ज संमत झाले आहे.

१०. आपल्या अधिकोषातील खात्यावर पैसे पाठवले आहेत.

११. आपल्या खात्याचा ‘पिन’ क्रमांक पालट करायचा आहे.

१२. भ्रमणभाष आस्थापनाने ‘ग्राहक परिचयाची ‘लिंक’ (केवाय्सी – Know your Customer) पाठवली आहे’, असे सांगून ती ‘क्लिक’ करण्यास सांगणे आणि त्या माध्यमातून संबंधिताच्या खात्यातून पैसे उकळणे.

अशा प्रकारे परिस्थितीचा अपलाभ घेत गोड बोलण्यातून नागरिकांना भुरळ घातली जाते. या वेळी सतर्कतेच्या अभावी फसवणूक करणार्‍या लोकांच्या भूलथापा किंवा पारितोषिकांच्या आमिषांना बळी पडल्याने नागरिकांची फसवणूक होते.

वास्तविक पहाता कोणत्याच कारणाने नागरिकांना भ्रमणभाषवर आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी मागितला जात नसल्याचे शासन-प्रशासन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादींनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. हे लक्षात घेऊन कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएम’चा पिन’, ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास किंवा पारितोषिक लागल्याची ‘लिंक’ पाठवून ती क्लिक करण्यास सांगितले की, त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष करावे. तसेच अशा प्रकारच्या भूलथापांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नये !

अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी. स्वत: सतर्क राहून कुटुंबीय आणि मित्रपरिवार आदींना सावध करावे !