‘कालोत्सव अणि जत्रोत्सव यांमध्ये चालणारा जुगार बंद करा’, अशी सत्तरी तालुक्यातील नागरिकांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस, प्रशासन आणि संबंधित देवस्थानचे व्यवस्थापन स्वतःहून जत्रोत्सवातील जुगार का बंद करत नाहीत ? जुगारवाल्यांच्या दहशतीपुढे प्रशासन नमते घेते का ?

जुगार (प्रातिनिधिक छायाचित्र)

वाळपई, २९ डिसेंबर (वार्ता.) – सत्तरी तालुक्यात साजरे होणारे देवतांचे कालोत्सव आणि जत्रोत्सव यांच्या निमित्ताने पत्त्यांचा जुगार मोठ्या प्रमाणात फोफावण्याची शक्यता यंदाही दिसून येत आहे. पत्त्यांचा जुगार खेळणार्‍यांकडून त्यासंबंधीची सिद्धता करण्यात येत असल्याचे समजते. पत्त्यांच्या जुगाराचे प्रतिकूल परिणाम या भागातील युवा पिढीवर होण्याची शक्यता असल्याने या पत्त्यांच्या जुगाराच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करून हा जुगार बंद करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. सत्तरी तालुक्यातील काही जागरूक युवक यासंबंधी पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. सत्तरीमध्ये मोठ्या प्रमाणात कालोत्सव आणि जत्रोत्सव साजरे केले जातात. अलिकडच्या काळात याला जोडूनच पत्त्यांचा जुगार चालू करण्यात येतो. अशा प्रकारे कालोत्सव साजरा करणे, ही वेगळ्या प्रकारची अनिष्ट प्रवृत्ती सत्तरी तालुक्यात रूढ होत आहे. कालोत्सवाच्या वेळी देवळाच्या समोर नाटक सादर करण्यात येते आणि त्याच वेळी देवळाच्या मागील बाजूला मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल करणारा पत्त्यांचा जुगार चालतो. याविषयी येथील जागरूक नागरिकांनी तीव्र अप्रसन्नता आणि चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या जुगारावर कारवाई न केल्यास येत्या काळात जुगाराचा विस्तार प्रत्येक गावाच्या कानाकोपर्‍यात होऊन युवा पिढी उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.