३१ डिसेंबर साजरा करून १ दिवसाचे मानसिक धर्मांतर करू नका ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ पद्धतीने धर्मप्रेमींच्या बैठकीचे आयोजन

सोलापूर २९ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबर साजरा करणे ही हिंदू संस्कृती नाही. मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचणे, ‘रेव्ह पार्ट्या’ करणे, अशा कृती या दिवशी सर्रास केल्या जातात. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढते. ज्या वीर क्रांतीकारकांनी विदेशी कापड्यांची होळी केली त्या विदेशी संस्कृतीचा अंगीकार का करायचा ? ३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे १ दिवसाचे मानसिक धर्मांतर केल्यासारखेच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

सुमित सागवेकर

३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन धर्मप्रेमी बैठकीत’ ते बोलत होते. ‘३१ डिसेंबर’ला आपल्या जीवनातून हद्दपार करण्याचे आवाहन श्री. सुमित सागवेकर यांनी या वेळी केले. या बैठकीला सोलापूर, बार्शी, कुर्डूवाडी, अंबाजोगाई, सांगोला, बीड, बारामती येथील ७० धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. या बैठकीत उपस्थितांनी विषय ऐकून ‘हर हर महादेव’, जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’,  अशा घोषणा संदेशाद्वारे दिल्या.

२. उपस्थित धर्मप्रेमींनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दिवशी कुणालाही शुभेच्छा न देण्याचा निश्‍चय केला.

उपस्थित धर्मप्रेमींनी केलेल्या धर्मरक्षणपर कृती

१. श्री. सूरज कांबळे – बॅनर बनवून देणार्‍या दुकानदाराने ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहू का ?’, असे विचारल्यावर त्याला ‘नको’, असे सांगितले. ‘हिंदु आहे हिंदूच रहाणार नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार’, असे त्या दुकानदाराला मी उत्तर दिले.

२. सौ. सुवर्णा मारकड – घरी प्रतिवर्षी नाताळ साजरा करतो; पण या वर्षी मुलीला नाताळ साजरा न करण्याविषयी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगितले. त्यामुळे मुलीने या वेळी नाताळ साजरा केला नाही.

३. कु. काजल मंठाळकर – मी माझ्या ‘व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस’ला ‘खरा नववर्ष गुढीपाडवा आहे. १ जानेवारीला कोणीही शुभेच्छा देऊ नये’, असे लिहीले. त्यामुळे अनेक कुटुंबियांनी आणि मैत्रिणींनी ३१ डिसेंबर आणि नाताळच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

४. सौ. अनुजा तपिसे – माझ्या मुलीच्या शाळेत नाताळ हा सण साजरा करण्यास सांगितले होते; पण मुलीचे मी प्रबोधन केले आणि आम्ही नाताळ साजरा केला नाही.