कु. अपाला औंधकर हिने भरतनाट्यम् नृत्य केल्यावर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांचा परिणाम आणि आलेल्या अनुभूती !

कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने भरतनाट्यम् नृत्य सादर केल्यावर कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये, त्यांचा परिणाम आणि आलेल्या अनुभूती !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने १७, १८ आणि १९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात भरतनाट्यम् नृत्यातील विविध प्रकार सादर केले. तिचे नृत्य पाहिल्यावर तिची जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये, या गुणवैशिष्ट्यांचा तिच्यावर आणि प्रेक्षकांवर झालेला परिणाम अन् त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

‘समाजातील अनेक जण नृत्य शिकतात. ते केवळ शारीरिक स्तरावर नृत्य शिकतात; परंतु ‘१३ वर्षांच्या अपालाने केलेल्या नृत्याच्या या लेखातून ती लहान वयातच कशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर नृत्याचा अभ्यास करून साधनेत प्रगती करते’, हे लक्षात येईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भरतनाट्यम् नृत्य सादर करतांना कु. अपाला औंधकर

१. कु. अपाला हिचे नृत्य पहातांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांचा तिच्यावर अन् प्रेक्षकांवर झालेला परिणाम

२. भरतनाट्यम् नृत्याच्या अंतर्गत विविध प्रकार सादर केल्यावर तिचे नृत्य पाहून आलेल्या अनुभूती

२ अ. तिल्लाना : ‘तिल्लाना’ हा नृत्यप्रकार सादर करतांना वातावरणात निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झाल्याचे जाणवले. हा नृत्यप्रकार पहात असतांना मला ‘आनंद तांडव नृत्य’ करणार्‍या शिवाच्या ‘नटराज’ या रूपाचे दर्शन झाले आणि माझ्या मनाला शांतीची अनुभूती आली. ‘कु. अपालामध्ये शिवाप्रतीचा भाव जागृत होऊन ‘तिच्यामध्ये शिवतत्त्व कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले.

२ आ. गणेश श्‍लोकम् : हा नृत्यप्रकार सादर करतांना तिने भरतनाट्यम्चा शिवलेला पोषाख घातला होता. या नृत्याच्या वेळी कु. अपालामध्ये व्यक्त भाव जागृत झाल्याचे जाणवले. त्यामुळे तिच्याकडे गणपतीचे सगुण तत्त्व आकृष्ट होऊन तिने केलेल्या विविध मुद्रांमधून सगुण स्तरावरील शक्ती वातावरणात प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. त्यानंतर जेव्हा तिने गोल साडी नेसून हेच नृत्य सादर केले, तेव्हा तिच्याकडून चैतन्य आणि आनंद यांचे प्रक्षेपण अधिक प्रमाणात झाल्याचे जाणवले.

२ इ. नटेश कौतुकम् : हे नृत्य सादर करतांना मला डमरू घेतलेल्या शिवाचे दर्शन झाले. तिच्या या नृत्यातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद यांचे प्रक्षेपण होऊन माझ्या मनात शिवाप्रतीचा भाव जागृत होत होता. हे नृत्य चालू असतांना ‘नृत्याच्या ठिकाणी कैलासाचे पांढर्‍या रंगाचे वातावरण निर्माण झाले आहे’, असे जाणवून मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ झाला.

२ ई. विष्णूचे स्तुतीपर भजन : हा नृत्य प्रकार सादर करतांना श्रीविष्णूच्या सत्यनारायण, शेषशायी, बालाजी, गरुडावर स्वार झालेला या विविध रूपांचे दर्शन होऊन माझा श्रीविष्णुप्रती असणारा भाव जागृत झाला. जेव्हा तिने श्रीविष्णूच्या दशावतारांचे नृत्यातून वर्णन केले, तेव्हा श्रीविष्णूच्या दशावतारांचे दर्शन होऊन शक्ती, भाव, चैतन्य आणि आनंद जाणवत होता अन् माझ्या अंगावर रोमांच आले. तिचे नृत्य चालू असतांना मनाला पुष्कळ प्रसन्नता जाणवत होती. ‘मी पृथ्वीवर नसून वैकुंठात आहे आणि मी अपालाचे वैकुंठात होणारे नृत्य पहात आहे’, असे मला जाणवत होते. ‘नृत्याच्या ठिकाणी वैकुंठाचे फिकट निळसर रंगाचे वातावरण निर्माण झाले आहे’, असे जाणवून मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ झाला.

३. कु. अपालाने आधी केलेल्या आणि आता केलेल्या भरतनाट्यम् नृत्यामध्ये जाणवलेला भेद

यापूर्वी कु. अपालाने वर्ष २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये काही कार्यक्रमांमध्ये भरतनाट्यम् नृत्य सादर केले होते. ते नृत्य आणि तिने आता केलेले नृत्य पाहिल्यावर त्यांमध्ये पुष्कळ भेद जाणवतो. आता तिच्या नृत्यातील मुद्रांची अचूकता, चपळता, तालबद्ध नृत्य करण्याचे कौशल्य, पार्श्‍वसंगीताचा अर्थ समजून मुखावर दिसणारे हावभाव, भगवंताविषयीचा समर्पणभाव आणि आत्मविश्‍वास यांमध्ये पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ प्रमाणात वृद्धी झाल्याचे जाणवते. त्यामुळे तिचे नृत्य पहात असतांना त्यांतून पुष्कळ प्रमाणात भाव, चैतन्य, आणि आनंद यांची स्पंदने जाणून पहाणार्‍यांवर अधिक प्रमाणात आध्यात्मिक लाभ होतात, असे जाणवते. भरतनाट्यम् नृत्याच्या दृष्टीने तिने घातलेला पोषाख, अलंकार, केशभूषा आणि रंगभूषा (मेक अप) यांमध्ये तिचे सात्त्विक सौंदर्य अधिक खुलून येते. नृत्य करतांना आणि इतर वेळीही तिच्यामध्ये चैतन्य प्रवाहित होऊन वातावरणात प्रक्षेपित होते. त्यामुळे तिला पाहून, तिच्याशी बोलून आणि तिच्या सहवासात असतांना माझ्या मनाला पुष्कळ प्रसन्नता अन् उत्साह जाणवतो. तिचे नृत्य चालू असतांना ‘ते संपूच नये’, असे वाटते. तिच्या मनातील ईश्‍वरप्राप्तीची तळमळ आणि भाव वाढल्यामुळे ‘तिच्याकडून नृत्य करण्याची कृती ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना म्हणून अधिक मनापासून अन् भावपूर्णरित्या होत आहे’, असे जाणवते. आधीच्या तुलनेत तिचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि नृत्याचा सराव वाढल्याचे जाणवते. ‘ती ऋषिमुनींप्रमाणे शिव आणि विष्णु या देवतांच्या अनुसंधानात असते’, असे जाणवते. मी तिला नृत्याच्या व्यतिरिक्त अन्य वेळी आश्रमात वावरतांना पाहिल्यावर तिच्या मुखावर अधिक गोडवा जाणवतो आणि ‘तिला पहातच रहावे’, असे वाटते. ‘तिच्यातील भावामुळे आणि तिची आंतरिक साधना वाढल्यामुळे तिच्या मुखावरील गोडवा वाढून तिच्याकडून चांगली स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात’, असे जाणवते.

४. कु. अपालाच्या साधनामार्गानुसार इतरांना येणार्‍या अनुभूती

कु. अपालाचा साधना मार्ग भक्तीयोगांतर्गत ज्ञानयोग आहे. त्यामुळे तिच्या मनामध्ये पुष्कळ प्रमाणात जिज्ञासू वृत्ती जागृत राहून ती विविध विषयांचा बारकाईने अभ्यास करते. जेव्हा तिची अंतर्मुखता वाढते, तेव्हा तिचा भक्तीयोगांतर्गत ध्यानयोग कार्यरत होतो. त्यामुळे काही वेळा तिचा भाव जागृत होऊन तिचे ध्यान लागते. कु. अपालातील भक्तीयोगामुळे तिचे नृत्य पाहून पहाणार्‍यांचा भाव जागृत होतो, तिच्या ध्यानयोगामुळे पहाणार्‍यांचे ध्यान लागते आणि ज्ञानयोगामुळे नृत्य पहाणार्‍यांची नृत्याविषयी जिज्ञासा जागृत होते’, असे परिणाम होतात.

५. कु. अपालामध्ये असणार्‍या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांमुळे ती ‘भरतनाट्यम्’ या भारतीय नृत्यप्रकाराचा वारसा पुढे चालू ठेवणार’, असे जाणवणे

‘कु. अपालामध्ये असणार्‍या वरील आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांमुळे ती ‘भरतनाट्यम्’ या भारतीय नृत्यप्रकाराचा वारसा पुढे चालवून ईश्‍वरप्राप्ती करू शकते. तिच्याप्रमाणेच साधक कलाकार असतील, तर त्या साधक कलाकारांकडून प्राचीन भारतीय कलांची जोपासना होऊन त्यांचा प्रसार होऊ शकतो आणि कलांचा वारसा असाच पुढे चालू शकतो’, असे वाटले.

कृतज्ञता

‘हे भगवंता अपालाच्या माध्यमातून ‘भरतनाट्यम्’ हे सात्त्विक नृत्य पहाण्याची आणि त्याचे सूक्ष्म स्तरांवरील परिणाम अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळाली अन् अनेक सूत्रे शिकायला मिळाली’, यासाठी मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता अर्पण करत आहे. माझी कृतज्ञता तुझ्या चरणांपर्यंत पोचून माझ्यावर तुझ्या कृपेचा अखंड वर्षाव होऊ दे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक