कोल्हापूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने लांबलेल्या निवडणुका आता घेण्यात येत आहेत. कोल्हापूर महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून २१ डिसेंबरला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११ वाजता जाहीर होणार असून २३ डिसेंबर ते ४ जानेवारीपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागवून घेऊन त्यानंतर अंतिम आरक्षणाची घोषणा होणार आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीची मुदत ऑक्टोबर मासांत संपली आहे. सध्या महापालिकेवर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे या प्रशासक म्हणून कामकाज पहात आहेत. ८१ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. सध्या महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. यात शिवसेना सहभागी असून परिवहन सभापतीपद शिवसेनेकडे होते. गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने ही महापालिका घेण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यांना ते शक्य झाले नाही.