विधेयके सादर; मात्र चर्चा नाही !
सत्ताधारी आणि विरोधक यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचा अधिकाधिक वेळ द्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ दिवसांच्या होत असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केवळ शोकप्रस्ताव सादर करण्यात आले. शोकप्रस्तावांवर दोन्ही सभागृहांतील सदस्यांची भाषणे झाली. सभागृहात विधेयके सादर करण्यात आली; मात्र सभागृहाच्या प्रथेनुसार त्यांवर चर्चा घेण्यात आली नाही.
१४ डिसेंबर या दिवशी ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता, तर विधान परिषदेच्या कामकाजाला दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विधेयके सादर करण्यात आली. या सर्व विधेयकांवर १५ डिसेंबर या दिवशी चर्चा घेण्यात येणार आहे. विधेयके सादर केल्यानंतर दोन्ही सभागृहांतील तालिका सभापतींची नावे घोषित करण्यात आली. शोकप्रस्तावावरील भाषणांनंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले.