सोलापूर येथे महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियान

शहरातील १३ दुकानांवर दंडात्मक कारवाई

दुकानांवर कारवार्इ करतांना महानगरपालिकेचे कर्मचारी

सोलापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – येथे महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती अभियान राबवण्यात येत असून शासनाच्या महाराष्ट्र अविघटन कचरा केंद्र २००६ आणि सुधारित ११ एप्रिल २०१८ अधिसूचनेनुसार प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्रथम प्लास्टिक वापरतांना व्यक्ती किंवा दुकानदार आढळल्यास ५ सहस्र रुपये दंड आकारण्यात येईल, दुसर्‍यांदा ती व्यक्ती किंवा दुकानदार प्लास्टिक वापरतांना आढळल्यास १० सहस्र रुपये दंड आकारण्यात येईल, तसेच तिसर्‍या वेळी प्लास्टिक वापरतांना ती व्यक्ती आणि दुकानदार आढळल्यास त्यांच्यावर २५ सहस्र रुपये दंड आणि गुन्हा नोंद करण्यात येऊ शकतो.

दुकानांवर कारवार्इ करतांना महानगरपालिकेचे कर्मचारी

१. प्लास्टिक बंदी असूनही सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी प्लास्टिकचा वापर होतांना दिसत आहे. त्या अनुषंगाने ११ डिसेंबर या दिवशी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील १३ दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर १ लाख ६ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये १८० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

२. यापुढेही सोलापूर शहरातील विविध दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग न करता कापडी पिशवीचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे.