राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान


मुंबई – राज्यातील ३४ जिल्ह्यांतील अनुमाने १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ या दिवशी मतदान, तर १८ जानेवारी २०२१ या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी ११ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ११ डिसेंबर या दिवशी केली.

मदान यांनी सांगितले की…

१. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ सहस्र ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० या दिवशी मतदान होणार होते; परंतु कोरोनामुळे १७ मार्च २०२० या दिवशी निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. नंतर तो रहितच झाला.

२. डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

३. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० या दिवशी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

४. १५ जानेवारी २०२१ या दिवशी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ या दिवशी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.

५. अंतिम मतदारसूची १४ डिसेंबर २०२० या दिवशी प्रसिद्ध केली जाईल.