‘श्रीमती सुमंगला महालिंगप्पा मट्टीकल्ली या शहापूर (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथे रहातात. त्या माझ्या नणंद आहेत. त्यांचे माहेरचे नाव ‘कमला’ आहे. त्या ‘कमलाक्का’ या नावानेच सुपरिचित आहेत. वयाच्या ७० व्या वर्षीही त्या अतिशय उत्साही असून सतत कार्यरत असतात. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांच्याइतके खडतर जीवन कुणी जगला नसेल. खडतर जीवनाला त्यांनी हसतमुखाने कसे तोंड दिले, हे या लेखावरून समजेल आणि सर्वांनाच ‘आदर्श जीवन कसे जगावे’, याची ओळख होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. बुद्धीमान
कमलाक्का ७ वीपर्यंत शाळेत ‘हुशार मुलगी’ म्हणून ओळखल्या जायच्या. ७ वीची वार्षिक परीक्षा एप्रिल मासात होती आणि मार्च मासात त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी ७ वीची परीक्षा दिली आणि त्या चारही वर्गांत प्रथम आल्या. पुढे त्या सासरी गेल्यामुळे त्यांचे शिक्षण तेथेच थांबले.
२. कष्टमय जीवन
२ अ. एकत्र कुटुंब असल्यामुळे पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत अखंड घरातील कामे करणे : कमलाक्का सासरी आल्या. तेव्हा त्यांच्या घरात सासूबाई, सासरे, २ नणंदा, ५ दीर आणि आजी होत्या. त्यामुळे त्याना १० – १२ जणांसाठी स्वयंपाक करावा लागायचा. त्या केवळ १३ वर्षांच्या होत्या. त्यांना पूर्ण स्वयंपाक करता येत नव्हता; मात्र त्यांनी तोे लवकरच शिकून घेतला. कालांतराने सर्व दिरांचे विवाह होऊन त्यांनाही मुले झाली. त्यामुळे घरात लहान-मोठे धरून ३२ जण होते. सुटीच्या वेळी पुष्कळ पाहुणे असायचे. त्यांचे घर पुष्कळ मोठे होते. कमलाक्का पहाटे ५ वाजता उठून केर, सडा, रांगोळी करून अल्पाहार बनवत असत आणि नंतर स्वयंपाकाला लागत असत. सर्व कामे संपेपर्यंत रात्रीचे ११ वाजायचे. सणासुदीच्या दिवशी जवळजवळ १०० माणसे जेवायला असायची.
२ आ. सासूबाईंच्या तर्हेवाईकपणाला शांत राहून सामोरे जाणे : कमलाक्कांच्या सासूबाई मानसिक रुग्ण असल्यामुळे त्यांना सांभाळणे हे त्यांच्यासाठी एक आव्हानच असायचे. कधी कधी त्यांच्या सासूबाई सर्व कपडे पाण्यात भिजवून ठेवत. त्यामुळे कमलाक्कांना ते धुवावे लागायचे. टोपलीभर भाकरी थापून झाल्यावर कमलाक्का कपडे धुवायला गेल्या असता सासूबाई त्या सर्व भाकर्या दारात आलेल्या भिकार्यांना वाटून टाकायच्या. त्यामुळे कमलाक्कांना जेवणापूर्वी पुन्हा भाकरी कराव्या लागत. कमलाक्का हे सर्व हसत हसत सांगतात. त्याविषयी त्यांनी कधीच त्रागा करून घेतला नाही.
२ इ. सतत कार्यरत रहाणे : कमलाक्कांना सुना आल्या, नातवंडेही आहेत; परंतु त्यांचा दिनक्रम मात्र अजूनही पूर्वीप्रमाणेच आहे. आतासुद्धा कुणा नातेवाइकांकडे जातांना भाकरी, ठेचा, चटण्या, शेंगदाणा किंवा खोबर्याच्या गोड पोळ्या, चिवडा इत्यादी साहित्य घेऊन जातात. तेथे गेल्यावरही त्या शांत न बसता कामे करत रहातात.
२ ई. वयस्कर आजींची सेवा करणे : त्यांच्या घरात एक आजी होत्या. त्या जुन्या काळातल्या असल्यामुळे त्यांना आठवड्यातून एकदा अभ्यंगस्नान घालावे लागायचे. जवळजवळ घंटाभर संपूर्ण शरिराला तेल लावून चोळून झाल्यावर हंडाभर कडकडीत पाण्याने त्यांना अंघोळ घालावी लागत असे. हे सर्व कमलाक्का न कंटाळता आणि न थकता करायच्या.
३. त्यागी वृत्ती
कमलाक्कांचा सेवाभाव पाहून पूर्वी त्यांच्या घरी रहाणार्या आजींनी मृत्यूपूर्वी त्यांना १ कोल्हापुरी साज आणि ४ सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. पुढे दिरांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या सासर्यांनी ते सोने मागितले. तेव्हा मागचा-पुढचा विचार न करता कमलाक्कांनी ते त्यांना काढून दिले.
४. समाधानी
मी कमलाक्कांंना ४२ वर्षांपासून पहात आहे. त्यांच्या जीवनातील सर्व चढ-उतार मी जवळून पाहिले आहेत. इतरांकडून कोणतीही अपेक्षा न करता प्राप्त परिस्थितीत त्या अत्यंत समाधानी असतात.
५. खडतर प्रारब्धाला धिराने सामोरे जाणे
५ अ. यजमानांना धंद्यात यश न येणे आणि नंतर त्यांनी नोकरी करणे : कमलाक्कांचे यजमान कै. महालिंगप्पाही देवमाणूस होते. ते सर्वांत मोठे असूनही त्यांनी कधीही हक्क किंवा अधिकार गाजवला नाही. वडील आणि इतर भावंडे जे सांगत, ते सर्व महालिंगप्पा ऐकत असत. महालिंगप्पा यांचे दुकान होते. घरी लागणारे सर्व साहित्य त्या दुकानातूनच आणले जात होते. थोड्याच दिवसात त्यांचा धंदा ठप्प झाला. त्यानंतर त्यांनी चहाची पूड आणि गूळ यांचा व्यापार चालू केला. त्यातही त्यांना यश आले नाही.
एका कठीण प्रसंगामुळे ते घर सोडून गेले होते. ते ३ मासांनंतर घरी परत आले. तेव्हा त्यांची मिळकत नसल्याने ते घराचे दायित्व घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेगळी चूल मांडली आणि एके ठिकाणी नोकरी करू लागले.
५ आ. कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू होणे आणि तो आठवून दुःख न करणे : कमलाक्का यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाल्यानंतर वर्षभरातच तिचे निधन झाले. मोठा मुलगाही तरुण असतांनाच वारला. ५ वर्षांपूर्वी त्यांचे यजमान अर्धांगवायूने रुग्णाईत होते. त्यातच ते गेले. ‘भूतकाळातील कठीण प्रसंग किंवा कुटुंबियांचा मृत्यू आठवून कमलाक्का दुःखी झाल्या आहेत’, असे मी कधीच पाहिले नाही.
६. अध्यात्माची आवड असणे
कमलाक्कांना वेळ मिळेल, तेव्हा त्या एखादा सत्संग, प्रवचन किंवा कीर्तन चालू असलेल्या ठिकाणी एकट्याच जातात. तेथे सांगितलेले सर्व त्या श्रद्धेने करतात.
७. अनेक प्रसंगांत देवाचे साहाय्य लाभणे
७ अ. एका विवाह -सोहळ्यासाठी जाण्यास विलंब होत असतांना देवाला हाक मारणे आणि एका अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरून मंगल कार्यालयापर्यंत नेऊन सोडणे : एकदा कमलाक्कांना दूरवर असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी जायचे होते. घरातील सर्व कामे संपेपर्यंत इतर मंडळी विवाह सोहळ्यासाठी निघून गेली होती. विवाहाला जायला विलंब झाल्यामुळे ‘मुहूर्ताची वेळ चुकेल’, या भीतीने त्यांनी देवाला हाक मारली. तेव्हा वाटेत दुचाकीवरून जाणार्या एका व्यक्तीला त्यांनी थोड्या अंतरापर्यंत नेऊन सोडण्याची विनंती केली. त्या वेळी त्या व्यक्तीने त्यांना थेट मंगल कार्यालयापर्यंत नेऊन सोडले.
७ आ. स्थानकाच्या दिशेने चालत जातांना मार्ग चुकल्यावर एका दुचाकीस्वाराने स्थानकापर्यंत पोचवणे : एकदा त्यांना बाहेरगावी जायचे होते. त्यासाठी पहाटे ५.३० च्या सुमारास त्या स्थानकाच्या दिशेने चालत जात होत्या. थोडे पुढे गेल्यावर आपण मार्ग चुकलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी तेथून जाणार्या एका दुचाकीस्वाराला थांबवून त्यांनी स्थानकाकडे जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा त्या व्यक्तीने त्यांना दुचाकीवरून स्थानकापर्यंत पोचवले.
७ इ. रात्री ८.३० वाजता एकट्याच चालत घरी जात असतांना रिक्शावाल्याने पैसे न घेता घरी सोडणे : अलीकडेच २६ जानेवारीच्या कार्यक्रमात ३०० जण ‘वन्दे मातरम्’ हे गीत गाणार होते. गीत म्हणण्यात सहभागी होता आले नाही, तरी ते गीत ऐकण्याची त्यांची पुष्कळ इच्छा होती. त्यामुळे त्या कार्यस्थळी गेल्या. काही काम असल्याने गीत संपल्यानंतर त्यांना घरी लवकर परतायचे होते; पण त्यांच्या समवेत असलेल्या घरातील इतर मंडळींना तेथे आणखी थोडा वेळ थांबायचे होते. त्या वेळी रात्रीचे ८.३० वाजले होते. कमलाक्का एकट्याच चालत घरी जात होत्या. थोडे अंतर चालल्यावर एक रिक्शावाला येऊन म्हणाला, ‘‘आजी, या. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो.’’ रिक्शावाल्याला देण्यासाठी कमलाक्कांकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी नकार दिला. तेव्हा तो रिक्शावाला म्हणाला, ‘‘आजी, तुम्ही मला पैसे देऊ नका. माझी आई आजारी आहे. ‘ती बरी व्हावी’, यासाठी तुम्ही केवळ आशीर्वाद द्या.’’ त्याने कमलाक्कांना घराजवळ सोडले.
८. प्रेमभाव
८ अ. ‘रिक्शावाल्याची आई ठीक व्हावी आणि त्याचा धंदा चांगला चालावा’, यासाठी रामरक्षास्तोत्र म्हणणार असल्याचे सांगणे : ‘इतरांचे चांगले व्हावे’, यासाठी त्यांच्या नावाने रामरक्षास्तोत्र म्हटले, तर त्यांचे भले होतेच’, असे एका सत्संगात त्यांनी ऐकले होते. तेव्हापासून त्या दिवसभरात अनेक वेळा रामरक्षास्तोत्र म्हणतात. कमलाक्का त्या रिक्शावाल्याला म्हणाल्या, ‘‘तू माझ्यासाठी देवासारखा धावून आलास. ‘तुझी आई बरी व्हावी आणि तुझा धंदा चांगला चालावा’, यासाठी मी तुमच्यासाठी रामरक्षास्तोत्र म्हणेन.’’
८ आ. सर्वांवर सारखेच प्रेम करणे : कमलाक्का फार प्रेमळ आहेत. आपले आणि परके, असा भेदभाव त्या करत नाहीत. त्या सर्वांवर सारखेच प्रेम करतात. त्यांच्या या गुणामुळेच त्या सर्वांना हव्याहव्याशा वाटतात आणि त्यांचा आधार वाटतो. माझ्यासाठी कमलाक्का ‘नणंद’ नाही, तर ‘आई’ आहेत. वर्ष २००० मध्ये माझ्या आईचे निधन झाले. तेव्हापासून कमलाक्कांनी मला माहेरची उणीव कधीच भासू दिली नाही.’
– सौ. विजयलक्ष्मी आमाती (श्रीमती कमलाक्का यांची वहिनी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |