‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घाला ! – गोवा सुरक्षा मंच

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ने लावलेला फलक

पणजी, ९ डिसेंबर (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. श्री. नितीन फळदेसाई या पत्रकात पुढे म्हणतात, ‘‘बाबरी मशीद पुन्हा बांधली जाणार’, अशा अशायाचे फलक ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही आतंकवादी संघटना गोव्यात कशी लावू शकते ? देहली येथील शाईनबाग दंगल प्रकरणात या संघटनेने आर्थिक पुरवठा केल्याचा आरोप आहे; मात्र ही संघटना गोव्यात कोणत्याही भीतीविना वावरत आहे. याकडे सरकारचे लक्ष नसणे, हे दुर्दैवी आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावर गोवा प्रवेशबंदी घालणारे गोवा शासन आतंकवादी संघटनेविषयी गप्प का आहे ? सरकारने या संघटनेवर कारवाई न केल्यास नागरिकांना कायदा हातात घेणे भाग पडेल.’’

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा विषाणू गोव्यात ! – शैफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची भित्तीपत्रके मडगाव येथे प्रदर्शित झाल्याने हा विषाणू गोव्यात आल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे धर्मांधही गोव्यात वावरत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मत हिंदुत्वनिष्ठ शैफाली वैद्य यांनी ट्वीट करून व्यक्त केले आहे.

बाबरीवरील निबंध स्पर्धेवरून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! – प्रा. सुभाष वेलींगकर

बाबरी मशिदीवर विद्यालयीन निबंध स्पर्धा ठेवून समाजात द्वेष निर्माण करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या या कृतीचे ‘गोवा सुरक्षा मंच’चे प्रा. सुभाष वेलींगकर यांनी अभिनंदन केले आहे.