कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे योग्य नियोजन करा ! – पालकमंत्री उदय सामंत

आरोग्याशी सेवा करणार्‍यांना प्रथम प्राधान्य

पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोना विषाणूचा संसर्ग अल्प होत आहे, तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. हे लसीकरण करण्याविषयी सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत राबवण्यात येत असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम आणि कोरोना आजारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना यांविषयीची आढावा बैठक झाली. या वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपरोक्त आदेश दिले. या बैठकीला सिंधुदुर्गचे प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीफे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले,

१. ‘‘येत्या काळात शासन टप्प्याटप्प्याने कोरोनाची लस देणार आहे. या लसीचे डोस शासनाच्या सूचनेप्रमाणे प्राधान्याने आरोग्याशी संबंधित यंत्रणेत काम करणार्‍या सर्वांना देण्यात येणार आहेत. कोरोना लसीकरण हा ज्चलंत विषय असून आरोग्य आणि संबंधित यंत्रणांनी याचे काम काळजीपूर्वक, भान ठेवून अन् पारदर्शकपणे करावे. त्यासाठीचे नियोजनही अगदी अचूक असावे.

२. जिल्ह्यामध्ये अंदाजे ४ लाख लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्ययंत्रणेकडे आहे. जिल्ह्यामध्ये ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आतापासून सिद्धता करावी. कोरोना लसीची साठवणूक करण्यासह या लसीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात यावे.

३. लस टोचण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्‍यांच्या उपलब्धतेविषयी नियोजन असावे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रारंभ झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्ण यांची माहिती सिद्ध ठेवावी.

४. जिल्ह्यात आजही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जनतेने तोंडावर मास्क घालावा. सामाजिक अंतराचे पालन करावे. हात स्वच्छ धुण्यामध्ये हलगर्जीपणा करू नये.