पृथ्वीवर जन्माला आलेल्या दैवी बालकांचे असणारे विविध आध्यात्मिक गट

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी देवाच्या कृपेने गंधर्वलोक, उच्च स्वर्गलोक, महर्लोक आणि तपोलोक येथील अनेक जीव पृथ्वीवर धर्माभिमानी हिंदु, अध्यात्माविषयीचे जिज्ञासू, सनातनचे हितचिंतक, साधक अन् संत यांच्या पोटी जन्माला येत आहेत. ते पृथ्वीवरील सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे मायेत रमणारे नसून ईश्‍वरप्राप्तीसाठी पुढील साधना करण्यासाठी ईश्‍वरेच्छेने पृथ्वीवर जन्माला आले आहेत. त्यामुळे त्यांना ‘दैवी बालक’ अशी संज्ञा देण्यात आली आहे.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जनलोकातून पृथ्वीवर अवतरलेले अद्वितीय बालक पू. वामन राजंदेकर

१. दैवी बालकांचे विविध आध्यात्मिक गट असणे

अनेक दैवी बालकांमध्ये विविध प्रकारची गुणवैशिष्ट्ये जाणवतात. ढोबळ मानाने आपण सर्वांना ‘दैवी बालक’ म्हणत असलो, तरी आध्यात्मिकदृष्ट्या त्यांचे निरीक्षण केल्यावर त्यांच्यामध्ये विविध गट असल्याचे लक्षात येतात. ‘बाल सेवक, बाल जिज्ञासू, बाल भाविक, बाल साधक आणि बाल शिष्य’, या गटांतील दैवी बालकांची वैशिष्ट्ये कोणती, तसेच त्यांच्या पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी कोणते प्रयत्न वाढवायला हवेत, याविषयी मार्गदर्शन करणारी सारणी येथे दिली आहे.

कु. मधुरा भोसले

१ अ. बाल सेवक, बाल जिज्ञासू, बाल भाविक, बाल साधक आणि बाल शिष्य

२. दैवी बालकांचे पालक वरील सारणीचा अभ्यास करून दैवी बालकांविषयी चिंतन करून पुढील कृती करू शकतात.

अ. दैवी बालकाच्या गुणवैशिष्ट्यांप्रमाणे तो ‘बाल सेवक, बाल जिज्ञासू किंवा बाल भाविक आहे’, हे शोधू शकतात.

आ. दैवी बालकाच्या साधनेच्या आवडीनुसार त्याचा साधना मार्ग कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तीयोग आहे, हे ओळखू शकतात. त्याला अन्य योगमार्गांप्रमाणे प्रयत्न करण्यास न सांगता त्याच्या योगमार्गानुसार त्याला प्रयत्न करण्यास उद्युक्त करू शकतात, उदा. बाल सेवकाला ग्रंथ वाचन किंवा देवतांशी बोलणे, असे सांगण्यापेक्षा त्याच्या योगमार्गानुसार प्रत्येक कर्म सेवा म्हणून ते अधिकाधिक अचूक आणि परिपूर्ण करण्यास सांगू शकतात.

इ. दैवी बालकातील स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेनुसार त्याला स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांची प्रक्रिया सोप्या भाषेत सांगून त्याच्याकडून ही प्रक्रिया करवून घेऊ शकतात.

ई. दैवी बालकामध्ये साधकत्व जाणवत असेल, तर तो ‘बाल साधक’ या गटात असेल. त्याची पुढील आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी त्याच्याकडून स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया, तसेच भावजागृती अन् गुणसंवर्धन यांचे प्रयत्न करवून घेऊ शकतात. त्यामुळे बाल साधकाची आध्यात्मिक उन्नती शीघ्रतेने होऊन तो ‘बाल शिष्य’ या गटात जाईल.

उ. ‘बाल शिष्य’ या गटातील दैवी बालकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेला ‘शिष्य’ ग्रंथ त्याच्या क्षमतेनुसार वाचण्यास देऊ शकतात किंवा त्याला ग्रंथातील सूत्रे सोप्या भाषेत समजावून सांगू शकतात. ग्रंथातील चैतन्यामुळे शिष्याच्या गुणांचा संस्कार दैवी बालकावर होऊन तो चांगला शिष्य बनू शकतो. चांगला शिष्य बनल्यावरच दैवी बालकाची वाटचाल संतत्वाकडे होऊ शकते.

ऊ. आपल्या दैवी बालकात संमिश्र गुणवैशिष्ट्ये जाणवत असतील, तर दैवी बालकाच्या आवडीनुसार त्याच्याकडून विविध प्रयत्न करवून घेऊ शकतात, उदा. थोडा वेळ सेवा करणे, थोडा वेळ भावपूर्ण नामजप करणे, थोडा वेळ देवतांची चित्रे रंगवणे इत्यादी.

ए. सर्व दैवी बालकांमध्ये चांगली शक्ती कार्यरत आहे; परंतु त्यांची गेल्या जन्मीची साधना, स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अन् या जन्मीची साधना यानुसार त्यांचे विविध गट आहेत. ‘बाल सेवक, बाल जिज्ञासू आणि बाल भाविक आहे’ या गटांतील बाल साधक अन् त्यांचे पालक यांनी दैवी बालकाने लवकरात लवकर ‘बाल साधक’ या गटांत जाणण्याचे ध्येय समोर ठेवून प्रयत्न केले, तर ते देवाला अधिक आवडतील.

ऐ. आपले दैवी बालक हे ‘बाल साधक’ किंवा ‘बाल शिष्य’ या गटात असेल, तर अल्पसंतुष्ट न रहाता त्याच्या साधनेचा आढावा नियमितपणे संबंधित साधकाला द्यावा आणि त्याची पुढील उन्नती लवकरात लवकर होऊन तो संतपदाला कसा पोचेल, यासाठी प्रयत्नरत राहिल्यास देवाला अधिक आवडेल.

ओ. आपले दैवी बालक ‘बाल साधक किंवा बाल शिष्य’ या गटातील असल्यास त्याला मायेतील शिक्षण देण्याऐवजी सनातनच्या आश्रमात राहून साधना करण्यासाठी पाठवावे. त्यामुळे तो लहान वयातच ‘बाल संत’ बनू शकेल.

प्रार्थना !

‘हे भगवंता, तुझ्या कृपेने उच्च लोकांतील दैवी बालके पृथ्वीवर जन्माला आली आहेत. त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे आणि तूच त्यांच्याकडून साधनेचे पुढील प्रयत्न करवून घे अन् त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती करवून घे’, अशी तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०१८, रात्री १०.४५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक