गोव्यात खाणी पुढील ६ मासांत चालू होऊ शकतात! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण न झाल्यास गोव्यातील खाणी पुढील ६ मासांत चालू होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘मी खाण आस्थापनांच्या प्रतिनिधींसह केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांची नवी देहली येथे भेट घेतली. या भेटीच्या वेळी गोव्यातील खाणी चालू करण्यासंबंधीच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. खाणी चालू करण्यासंबंधीची प्रक्रिया जलदगतीने चालू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. या अनुषंगाने गोव्यातील खाण खाते आणि केंद्रीय खाण मंत्रालय यांच्यामध्ये सातत्याने समन्वय चालू आहे. यापुढे खाणी चालू करण्यासाठी नवीन कायदेशीर अडथळा निर्माण न झाल्यास खाणी पुढील ६ मासांत चालू होऊ शकतात.’’

सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१८ मध्ये ८८ खनिज खाणींचे ‘लिज’ (मालकीहक्क न देता दीर्घ कालावधीसाठी भूमी वापरण्यास देणे) रहित केल्यानंतर गोव्यातील खाण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. हे प्रकरण आता न्यायाप्रविष्ट असल्याने गोवा शासन खाणी चालू करण्यासाठी अन्य कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यासाठी केंद्राकडे सातत्याने मागणी करत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गत आठवड्यात खाणी चालू करण्यासाठी खाणीच्या लिजांचा लिलाव करणे यांसारखे पर्याय खुले असल्याचे म्हटले होते.