मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका ! – प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीचे आयुक्तांना निवेदन

सध्याचे प्रतापसिंह उद्यान

सांगली, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रतापसिंह उद्यान हे सांगलीचे युवराज प्रतापसिंह महाराजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. ज्येष्ठ, महिला, मुले यांच्यासह प्रत्येक थरातील लोकांना याची आवश्यकता आहे. अनेक गरजूंसाठी हे उद्यान आश्रयस्थान आहे. त्यामुळे ऐतिहासिक असलेले आणि मध्यवर्ती असणारे प्रतापसिंह उद्यान बंद करू नका, अशा मागणीचे निवेदन प्रतापसिंह उद्यान बचाओ समितीच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्तांना देण्यात आले. या निवेदनावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके, सर्वश्री दिलीप कुलकर्णी, किशोर लांजेकर, राजाभाऊ शिंदे, यशवंत शिंदे यांसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप

सांगली – प्रतापसिंह उद्यानाशी सांगलीकरांची पिढ्यान्पिढ्या आस्था जोडली गेलेली आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उद्यानातील प्राण्यांचे स्थलांतर घडवून ते बंद पाडले. आता प्रशासनाने तेथील जुनी इमारत भाडेपट्टयाने लिलावात दिली आहे. त्याला अंतिम मान्यता देण्यासाठी महासभेत विषय येणार आहे. त्या वेळी त्याला विरोध करू. यापूर्वी महापालिका क्षेत्रातील मोक्याचे भूखंड आधी भाड्याने देण्याच्या नावाखाली नंतर मालकाच्या घशात घालण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रतापसिंह उद्यानाचा भाडे लिलावाच्या माध्यमातून होणारा बाजार हाणून पाडू, अशी चेतावणी भाजप नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांनी दिली आहे.

सध्याचे प्रतापसिंह उद्यान

प्रतापसिंह उद्यानाचे रक्षण व्हावे ! – सांगलीकरांची अपेक्षा

१. सांगलीचे वैभव असलेल्या प्रतापसिंह उद्यानाची भूमी उपहारगृहासाठी देण्याच्या सांगली महापालिकेच्या प्रस्तावास सांगलीकरांचा विरोध आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावर असलेले येथील प्राणीसंग्रहालय कधीच संपुष्टात आले असून सध्या प्राणी संग्रहालयाच्या जागेत केवळ कचर्‍याच्या गाड्या लावल्या जातात. प्राणी संग्रहालयाची दक्षिणेकडील बाजू कुत्र्यांचा दवाखाना अशी पाटी लावून बंद केली आहे.

२. हे उद्यान नाहीसे झाल्यास परिसरातील गुलमोहोर, नीलमोहोर, ब्रह्मदंडी, पिंपळ, जांभूळ यांसारखे २०० हून अधिक वृक्ष तोडले जातील. त्यामुळे शहरातील प्रदूषण अधिक वाढेल.

३. हे वृक्ष पक्षांचे नैसर्गिक निवासस्थान आहे. धनेश, शिंजिर, तांबट, घार, घुबड, काळा शराटी असे कित्येक पक्षी येथे दिसतात. त्यांचे नैसर्गिक घर नष्ट होईल.

४. सांगलीतील सामान्यांना कुटुंबासह बाहेर जाण्याचे ठिकाण नाहीसे होईल.

५. त्यामुळे शहराचे फुफ्फुस असणार्‍या या हिरव्यागार प्रतापसिंह उद्यानाला वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी सामान्य सांगलीकरांची अपेक्षा आहे.