पणजी, २० जून (वार्ता.) – हणजूण समुद्रकिनारपट्टीवरील वादग्रस्त ‘कर्लीस बीच शॅक’वर चालू असलेली अनधिकृत ‘ट्रान्स पार्टी’ बंद करण्याचा आदेश बार्देश तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांनी हणजूण पोलिसांना दिला आहे.
‘कर्लीस बीच शॅक’ येथे २३ ऑगस्ट २०२२ मध्ये भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. सोनाली फोगाट यांना बळजोरीने अमली पदार्थ पाजल्याचा आरोप होता. या घटनेनंतर गोवा पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्याच्या अंतर्गत (‘एन्.डी.पी.एस्.’) ‘कर्लीस बीच शॅक’चे मालक लिनेट न्यूनीस यांचा भाऊ एडवीन न्यूनीस यांना कह्यात घेतले होते. तसेच वर्ष २००८ मध्ये ब्रिटीश युवती स्कार्लेट किलिंग हिची हणजूण समुद्रकिनार्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. मृत्यूपूर्वी स्कार्लेट हिला अमली पदार्थ पाजल्याचा आरोप होता. स्कार्लेट हिच्या हत्येचा संबंध ‘कर्लीस बीच शॅक’शी होता, असा अन्वेषण यंत्रणांचा दावा होता. यामुळे ‘नाईट लाईफ’शी निगडित ‘कर्लीस बीच शॅक’ नेहमी वादाच्या भोवर्यात सापडला आहे.