दोडामार्ग – तालुक्यातील आयी आणि मांगेली या २ ग्रामपंचायतींच्या सरपंचांवर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता; मात्र आता सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जात असल्याने या अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने २३ नोव्हेंबरला या दोन्ही ठिकाणी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदस्यांनी जरी सरपंचांना नाकारले असले, तरी त्यांचे भवितव्य निवडून दिलेल्या जनतेच्या हातात आहे. त्यामुळे या विषयावर होणार्या ग्रामसभेत ग्रामस्थ काय भूमिका घेतात, त्यावर सरपंचांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
२३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता दोन्ही ग्रामपंचायतींच्या कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी होणारे मतदान गुप्त मतदान पद्धतीने होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या आयी ग्रामपंचायत सरपंच प्रार्थना मुरगुडी यांच्या विरोधात पहिला अविश्वास ठराव संमत झाला होता, तर सप्टेंबर मासात मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. हे दोन्ही सरपंच थेट सरपंच निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडून आल्याने सदर प्रक्रियेसाठी ग्रामसभेचे मतदान आवश्यक होते. कोरोना काळात ग्रामसभा घेणे अशक्य असल्याने दोन्ही ठिकाणी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेस उपस्थित प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य राहील, तसेच शारीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य आहे.