मर्यादित संख्येतील वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिक वारीला अनुमती

सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाकडून आदेश !

मुंबई – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल. वारीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासन आवश्यक ती उपाययोजना करेल. यंदाच्या २४ नोव्हेंबरच्या पंढरपूर कार्तिक वारीसाठी कायदा आणि सुरक्षेसाठी शासन योग्य ते नियोजन करील, असे आश्‍वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. १९ डिसेंबरला वारकरी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, समस्त वारकरी फंड दिंडी समाजाचे अध्यक्ष आदींसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी यांनी त्यांची भेट घेतली.

महामारीच्या पार्श्‍वभूमीवर वारकर्‍यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकर्‍यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा यशस्वी व्हावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. पालख्यांसाठी ३४ विश्रांतीस्थळांना कायमस्वरूपी जागेसाठी सर्वेक्षण, बसगाड्यांची सोय, पालखी मार्गावरील डागडुजी आदींच्या संदर्भातील आदेश या वेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.