सर्दीवरील आयुर्वेदीय उपचार

सर्दीचे मूळ कारण ‘व्हायरस’ जातीचे जंतू ! जरी जंतूंमुळे सर्दी होत असली, तरी एकंदरीतच सर्व शरिराची (नाकाच्या अंतस्त्वचेतील) रोगप्रतिकारक शक्ती न्यून झाल्यास सर्दी होते.

सर्वसाधारण उपचार

  • केशर आणि वेखंड पाण्यात उगाळून त्याचा लेप नाकाच्या आजूबाजूस आणि कपाळावर लावावा.
  • झोपतांना कान, डोके झाकावे, दिवसा पायात चप्पल घालाव्यात.
  • मोहरी, ओवा किंवा वेखंडाचे चूर्ण तव्यावर गरम करून रूमालात त्याची पुरचुंडी बांधून नाकाच्या आजूबाजूस शेक घ्यावा.
  • गरम पाण्याच्या किटलीच्या तोटीतून बाहेर येणारी वाफ हुंगावी, निलगिरी तेल किंवा लसूण अधून मधून हुंगावा.
  • हळदीचे चूर्ण १ ते २ चमचे तुळशीच्या रसात चाटवावे.
  • सुंठ, मिरे, पिंपळी, तुळस, दालचिनी आणि पातीचा चहा यांचा काढा घ्यावा.
  • जास्त ताप किंवा अंग दुखत असल्यास त्रिभुवनकीर्ती रस किंवा आनंदभैरव रस घ्यावा.
  • हलका आहार घ्यावा, लंघन करावे. सुंठ, मिरी, पिंपळी घालून सिद्ध केलेली भाताची पेज किंवा मुगाचे किंवा कुळीथाचे कढण किंवा मुळ्याचा रस घ्यावा.
  • चित्रक हरितकी अवलेह १-१ चमचा २ वेळा १ मास घ्यावा.