आयुर्वेदाची महनीय परंपरा

काय, शल्य, शालाक्य, बाल, ग्रह, विष, रसायन आणि वाजीकरण अशी आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. आयुर्वेदाच्या सर्व संहिता आणि संग्रह ग्रंथ यांत ब्रह्मदेवाला आयुर्वेदाचा आदिप्रवक्ता म्हटले आहे.

ब्रह्मदेवाने ही विद्या दक्ष प्रजापति आणि भास्कर यांना दिली. दक्षाच्या आयुर्वेदविषयक परंपरेत सिद्धांताला आणि भास्कराच्या परंपरेत चिकित्सापद्धतीला प्राधान्य होते. दक्ष प्रजापतीकडून अश्‍विनीकुमारांनी समग्र आयुर्वेदाचे अध्ययन केले. अमृत मिळवण्यासाठी औषधी निवडून काढणे आणि योग्य स्थानी त्यांची निपज करणे, हे अश्‍विनीकुमारांचे विशेष कार्य होय. अश्‍विनीकुमारांनी वृद्ध च्यवनऋषींना त्यांच्या चिकित्सेने तारुण्य प्राप्त करून दिले, अश्‍विनीकुमारांनीच इंद्राला आयुर्वेद शिकवला. इंद्राने भृगू, अंगिरा, अत्री, वसिष्ठ, कश्यप, अगस्त्य, पुलस्त्य, वामदेव, असित आणि गौतम या दहा ऋषींना आयुर्वेदाचे ज्ञान करून दिले.