आयुर्वेदातील सोपी घरगुती औषधेही अ‍ॅलोपॅथीपेक्षा सरस !

भारतीय आयुर्वेदातील घरगुती उपायसुद्धा किती गुणकारी आहेत, याचे भान ठेवून आयुर्वेदाचे आचरण करा !

पू. गुरुनाथ दाभोलकर

‘माझ्या तळपायांना आणि टाचांना भेगा पडतात. हिवाळ्याच्या दिवसांत त्याचे प्रमाण अधिक असते. या भेगांमुळे चालतांना त्रास होऊन रक्तही येत असे. त्याच्या वेदना असह्य असायच्या. भेगा बुजण्यासाठी मी वैद्यांच्या समुपदेशानुसार अनेक प्रकारच्या किमती रासायनिक मलमांचा उपाय केला; परंतु गुण आला नाही. पू. शेंडेआजोबांनी मला आमसुलाचे (कोकम) तेल लावण्यास सुचवले. त्याप्रमाणे गेल्या हिवाळ्यात मी आमसुलाच्या तेलाचा गोळा तळपाय आणि टाचा यांवर फिरवला. दोन दिवसांतच माझ्या पायांच्या भेगा मऊ पडल्या आणि टाचा गुळगुळीत झाल्या. त्याचा नियमित वापर केल्याने अल्प दिवसांतच आता माझ्या पायांच्या भेगा पूर्णपण बर्‍या होऊन टाचा आणि पायांचे तळवेही मऊ झाले आहेत. या अनुभवामुळे माझ्या मनातील आयुर्वेदिक उपायांचे महत्त्व अधिक दृढ झाले.

बाजारात मिळणार्‍या महागड्या मलमांनी जो उपाय होणार नाही, तो उपाय अतिशय अल्प मूल्य देऊन झाला. त्यामुळे बाजारातील महागड्या वस्तूंच्या दिखाऊपणाला भुलणार्‍या रुग्णांनी भारतीय आयुर्वेदातील घरगुती उपायसुद्धा किती गुणकारी आहेत, याचे भान ठेवून आयुर्वेद आचरावा.’

– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.२.२०१५)

संतांचा संकल्प आणि मिठाचा सोपा घरगुती उपचार यांमुळे खोकला लगेच बरा होणे

घशाला जंतूसंसर्ग होऊन खोकल्याचा त्रास होणे

‘प्रतिवर्षी मला १-२ वेळा खोकल्याचा पुष्कळ त्रास होतो. त्रास चालू झाल्यावर एक ते दीड मास आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे, तसेच आयुर्वेदीय औषधेही घ्यावी लागतात. मार्च २०१४ मध्ये घशाला जंतूसंसर्ग होऊन पुष्कळ खोकला झाला होता. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांनी ठीक वाटत नव्हते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या मिठाच्या उपायाने खोकल्याचा त्रास ५० टक्के उणावणे

एप्रिल २०१४ मध्ये सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला ‘रात्री झोपतांना १ चिमूट मीठ जिभेच्या मागच्या भागात घसा खवखवतो त्या ठिकाणी चोळून ५ मिनिटे थांबून नंतर ते थुंकून टाका’, असे सांगितले. हे केल्यावर मला पुष्कळ चांगलेे वाटले. दुसर्‍या दिवशी माझा त्रास ५० टक्के उणावला आणि ३-४ दिवसांतच पूर्ण ठीक झाला. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे सद्गुरु दादांनी सांगितलेल्या उपायामुळे सेवेतील अडथळे दूर झाले, यासाठी कोटीशः कृतज्ञ.’

– श्रीमती सुनिता चितळे (२०.५.२०१४)

लहानपणापासून होत असलेला घसा दुखण्याचा (टॉन्सिल्सचा) त्रास आयुर्वेदिक औषधांनी उणावणे

‘मला लहानपणापासूनच घसा दुखण्याचा (टॉन्सिल्सचा) (Tonsillitis) त्रास आहे. वर्ष २०१० पासून तो पुष्कळ तीव्र झाला होता. थोडे थंड पेय घेतले वा थंड पदार्थ खाल्ला, तर घसा बसून ताप यायचा आणि पुष्कळ ताकदीची प्रतिजैविके (Strong Antibiotics) घ्यावी लागायची. वर्ष २०१३ मध्ये माझ्या मावशीने मला रात्री झोपण्यापूर्वी सीतोपलादी चूर्ण थोड्याशा मधाबरोबर घ्यायला सांगितले. मावशीने सांगितल्याप्रमाणे मी ते औषध घेतल्यावर घसा दुखण्याच्या त्रास पुष्कळ न्यून झाला आणि त्यानंतर प्रतिजैविकेही घ्यावी लागली नाहीत.’

– कु. प्रणिता सुखटणकर, कोची, केरळ. (१६.६.२०१४)