स्वास्थ्य !

आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ अन् आरोग्यसंपन्न रहाते. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था, म्हणजेच आरोग्य !

शारीरिक स्वास्थ्य : सुदृढ, बलवान, बांधेसूद आणि भरदार शरीर, तेजस्वी डोळे, कांतीमान त्वचा, तुकतुकीत केस, चांगली भूक, शांत झोप, नाडी, श्‍वास, लघवी, शौच, सांध्याच्या हालचाली, इतर सर्व अवयवांची आणि सर्व इंद्रियांची कार्ये व्यवस्थित आणि सुलभरितीने होणे ही शारीरिक स्वास्थ्याची लक्षणे होत.

मानसिक स्वास्थ्य : मनामध्ये कोणतेही दुःख किंवा तणाव नसणे, काम-क्रोधादी षड्रिपूंवर ताबा असणे, कर्तव्यात दक्ष असणे, प्रत्येक कृती कौशल्याने आणि उत्साहपूर्ण करणे ही मानसिक स्वास्थ्याची लक्षणे होत.

आध्यात्मिक स्वास्थ्य : सतत सच्चिदानंद स्वरूपात रहाणे, त्यासाठी स्वार्थ आणि आसक्ती सोडून निष्काम बुद्धीने भगवद्भक्ती करणे आणि त्यात समाधानी असणे हे आध्यात्मिक स्वास्थ्य होय.

समाजस्वास्थ्य : आपण समाजाचा एक घटक असून समाज सुखी असेल, तरच आपण सुखी होऊ; म्हणून इतरांसाठी झटण्याची मनोवृत्ती असणे, सर्वांविषयी प्रेम, क्षमाशीलता, समाजकार्यासाठी वेळ देणे यामुळे समाजस्वास्थ्य टिकून राहू शकते.

केवळ रोगांपासूनच नव्हे, तर भवरोगांतून म्हणजे जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त करून मानवाला दुःखापासून कायम मुक्त करणे आणि मोक्षाची प्राप्ती करून देणे हेच आयुर्वेेदाचे अंतिम ध्येय आहे. (संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ)