दिनचर्या सुलभ आणि आरोग्यदायी होण्यासाठी करावयाच्या कृती

‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी (साधना करण्यासाठी) शरीर निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.’ शरीर निरोगी रहावे, यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतूचर्या सांगितल्या आहेत. साधकांनी त्यांचे पालन केल्यास आरोग्य सुधारण्यासह साधनेची फलनिष्पत्तीही वाढते.

१. ब्राह्ममुहूर्तावर उठणे

‘आयुर्वेदामध्ये ‘ब्राह्ममुहूर्तावर उठावे’, असे सांगितले आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी ९६ ते ४८ मिनिटांचा काळ. या वेळेत उठल्यास शौचाची संवेदना आपोआप निर्माण होऊन पोट साफ होते. ज्यांना ब्राह्ममुहूर्तावर उठणे शक्य नाही, त्यांनी न्यूनातिन्यून सकाळी ७ वाजेपर्यंत तरी उठावे. हळूहळू लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. सूर्योदयानंतर झोपून राहिल्यास अंग जड होणे, आळस येणे, पचनसंस्था बिघडणे, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास उद्भवू शकतात.

२. सकाळी उठल्यावर पाणी पिऊ नये !

काही योगशिक्षक सकाळी उठून तांब्याभर पाणी पिण्यास सांगतात. योगशास्त्राचे सर्व नियम पाळून नियमितपणे आसने, प्राणायाम इत्यादी करणार्‍यांना असे पाणी प्यायल्यास काही अपाय होत नाही; परंतु सामान्य माणसाने सकाळी अनावश्यक पाणी प्यायल्यास त्याची पचनशक्ती मंद होते. पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी. तो मंद होणे, हे सर्व रोगांचे कारण आहे.

३. शौच

पुष्कळ जणांचे ‘सकाळी चहा घेतल्याविना शौचाला होत नाही’, असे गार्‍हाणे (तक्रार) असते. बर्‍याच वेळा हा सवयीचा परिणाम असतो. ज्यांना सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही त्यांनी साधारण १ आठवडा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण उष्ण पाण्यातून घ्यावे. सकाळी उठल्यावर २ मिनिटे फेर्‍या मारून शौचाला जाऊन बसावे; पण कुंथू नये (जोर करू नये). असे ८ दिवस केल्यास हळूहळू सकाळी उठल्यावर पोट साफ होण्याची सवय लागते.

४. मुखमार्जन

प्रथम कुंचल्याने (ब्रशने) दात स्वच्छ करावेत. त्यानंतर ‘(सनातन) दंतमंजन’ किंवा ‘(सनातन) त्रिफळा चूर्ण’ यांनी हळूहळू दात घासावेत आणि हिरड्यांनाही ते चूर्ण लावावे. यामुळे हिरड्या बळकट होतात. कोणत्याही टूथपेस्टमध्ये ‘फ्लोराइड’ आणि ‘सोडियम लॉरिल सल्फेट’ नामक हानीकारक घटक असतात. त्यामुळे टूथपेस्टचा वापर टाळावा.

५. अंगाला तेल लावणे (अभ्यंग)

संपूर्ण अंगाला आवश्यकतेनुसार दाब देऊन खोबरेल, तीळतेल, सरकीचे तेल यांपैकी कोणतेही तेल साधारण ५ मिनिटे चोळावे. अभ्यंग केल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत, तरतरी येते, दृष्टी सुधारते आणि अंग पुष्ट हाऊन बळकटी येते. सांध्यांना वंगण मिळते. थंडीच्या दिवसांत कोरड्या हवेत थंडीमुळे त्वचा फुटते, तसेच पायाला भेगा पडतात. अशा वेळी अभ्यंग केल्यास लगेच लाभ दिसून येतो. अभ्यंगामुळे स्थूल माणसाचा मेद (चरबी) झडतो आणि कृश माणसाचे शरीर पुष्ट होते. हे कार्य मेद धातूमधील सूक्ष्म अन्न वाहून नेणार्‍या वाहिन्या मोकळ्या झाल्याने साध्य होते.

६. स्नान

अंगाला तेल लावलेले असल्याने स्नानासाठी कोमट पाणी घ्यावे. स्नान करतांना प्रथम आपले डोके भिजवावे, मग पाय भिजवावेत. पहिल्यांदाच पाय ओले केल्यास शरिरातील उष्णता वर जाऊन आरोग्याला अपाय होतो. डोक्यावर उष्ण पाणी घेतल्याने केस गळतात, म्हणून डोक्यावर नेहमी कोमट पाणी घ्यावे. थंड पाण्याने अंघोळ करणारा डोक्यावर थंड पाणी घेऊ शकतो. थंडीच्या दिवसांत थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.

स्नान करतांना मोठ्याने नामजप केल्याने किंवा स्तोत्र म्हटल्याने अंघोळीनंतर थकवा येत नाही !

अंगावर एकाएकी पाणी ओतल्यामुळे प्राण आणि उदान वायूंच्या गतींमध्ये असंतुलन निर्माण होते. काहींना स्नान झाल्यावर एकाएकी थकायला होते, तेव्हा त्यामागे प्राण आणि उदान वायूंची गती असंतुलित होणे, हे एक कारण असू शकते. पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर ओततांना मोठ्याने नामजप केल्यास किंवा एखादे स्तोत्र म्हटल्यास प्राण आणि उदान वायूंची गती संतुलित रहाते आणि अंघोळीनंतर थकवा येत नाही.