रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावा !
रात्री झोपतांना डोक्याला भरपूर तेल लावल्यास शांत झोप लागते. तेल टाळूत जिरवावे. सकाळी अभ्यंगासाठी वापरतो त्याप्रमाणे कापूरमिश्रित तेल डोक्याला लावावे. अंथरुणाला तेल लागू नये म्हणून डोक्याभोवती वेगळे कापड बांधावे. घडी सोडलेली जुनी गांधी टोपी किंवा जुनी कानटोपीही वापरू शकतो.
पायांच्या तळव्यांना तूप लावणे
प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना अर्धा चमचा देशी गायीचे साजूक तूप ५ मिनिटे चोळावे. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि झोपही शांत लागते. तूप चोळण्यास काशाची वाटी मिळाली, तर उत्तम; पण ती नसल्यास हाताच्या तळव्यांनी तूप चोळावे. तूप चोळल्यावर ते अंथरुणाला लागू नये म्हणून दोन्ही पावले वेगवेगळ्या कपड्यांत गुंडाळून ठेवावीत. जुने पायमोजेही वापरू शकतो. सकाळी उठल्यावर पाय साबण लावून धुवावेत म्हणजे पायाचे तूप निघून जाईल. पायाला लावण्यासाठी देशी गायीचे साजूक तूप उपलब्ध नसल्यास खोबरेल तेल लावावेे.
डोळ्यांत तूप घालणे
प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही डोळ्यांमध्ये १-१ थेंब तूप घातल्यास डोळे निरोगी रहातात आणि चष्म्याचा क्रमांक वाढत नाही.
पूर्वसिद्धता : एक काचेची लहान रिकामी बाटली स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी. ‘सनातन अत्तरा’ची रिकामी बाटलीही वापरू शकतो. बाटलीसह एका निराळ्या डबीत कानात थेंब घालण्याचा किंवा लहान मुलांना औषध देण्याचा जाडसर प्लास्टिकचा ‘ड्रॉपर’ ठेवावा. देशी गायीच्या शुद्ध घरगुती तुपाच्या वर जी निवळी (पातळ तूप) असते, ती या बाटलीत भरावी. तुपाची निवळी न मिळाल्यास देशी गायीचे घरगुती शुद्ध तूप घ्यावे. साजूक तूपही न मिळाल्यास आयुर्वेदीय औषधालयांमध्ये मिळणारे ‘त्रिफळा घृत’ नावाचे तूप घ्यावे. तूप प्लास्टिकच्या बाटलीत घालू नये; कारण प्लास्टिकचा काही अंश तुपात विरघळतो आणि असे तूप डोळ्यांत घातल्यावर डोळे चुरचुरतात. तूप थिजले (गोठले) असल्यास रात्री झोपण्यापूर्वी ती बाटली गरम पाण्यात धरून तूप विरघळवून घ्यावे. बाटली पाण्यातून काढून बाटलीला लागलेले पाणी कपड्याने पुसून घ्यावे.
कृती : अंथरुणात पडल्या पडल्या दोन्ही डोळ्यांमध्ये तूप घालावे आणि बाटली बाजूला ठेवून झोपून जावे.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ ‘शांत निद्रेसाठी काय करावे ?’)