आपल्याकडील स्वदेशी औषधी म्हणजे आयुर्वेद ! निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेला, बहाल केलेला अनमोल खजिना ! आयुर्वेदातील औषधे मंत्रांवर आधारित आहेत. आपल्या ऋषिमुनींनी खोलवर अभ्यास करून, खडतर तपश्चर्या, म्हणजेच साधना करून मंत्र सिद्ध करून घेतले आणि आम्हाला किती मोलाचा हा खजिना दिला आहे.
आमच्यावर विदेशींचा एवढा पगडा बसला आहे की, आम्ही हे स्वदेशी मंत्रच विसरलो आहोत. कुणीही आजारी पडले की, ‘विदेशी औषधे घ्यायची आणि आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा’, असे आपण करतो. या औषधांचे दुष्परिणाम (Side Effects) मात्र आपण विसरतो. भारतात मिळणारी ब्रूफेन, अॅनाल्जिनसारखी वेदनाशामक औषधे परदेशात १०-१२ वर्षांपूर्वीच विकायला कायद्याने बंदी केली आहे; ती त्यांच्यातील घातक दोषांमुळेच; भारतात मात्र त्याचा सर्रास वापर केला जातो. आपल्याकडील तज्ञांनी पण याचा कधी अभ्यास केला नाही का ?
आणखी एक तोटा म्हणजे ही विदेशी आस्थापने आमचाच पैसा, आमच्याच जिवावर, आमचेच जीवन उद्ध्वस्त करून, भारतातून खोर्याने ओढून अब्जावधी रुपयांचा लाभ करून स्वत:च्या देशांत घेऊन जात आहेत. आपण मात्र डोळ्यांना पट्टी बांधून बसलो आहोत. आपल्यासारखे दुर्दैवी आपणच !
(संस्कृती दर्शन : वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.)
– वैद्य सुविनय दामले